मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर आता कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष असून या जागेवर सहआयुक्तांना बढती दिली जाते की सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते हे पाहिलं जाणार आहे. सहआयुक्तांमधून बढती दिल्यास सामान्य प्रशासनाचे मिलिन सावंत यांचे नाव अग्रक्रमावर असून सनदी अधिकाऱ्यांमधून ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची वर्णी लागली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सहआयुक्तांमधून अतिरिक्त आयुक्त पदावर सहआयुक्तांना बढती देण्यास सनदी अधिकाऱ्यांकडून विरोध होत असल्याने राजेश नार्वेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नार्वेकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्याही असून त्यांच्या प्रयत्नाने नार्वेकर यांची वर्णी महापालिकेत लावली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे, टिळकांनी खरेच शिवरायांची समाधी बांधली का? )
पदभार देण्यासाठी प्रयत्न केला होता
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सुरेश काकाणी हे सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडील पदभार अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्याकडे अतिरिक्त कारभार म्हणून देण्यात आला आहे. काकाणी निवृत्त होण्यापूर्वीच संजीव कुमार यांनी आयुक्तांकडे मोर्चेबांधणी करून काकाणी यांच्याकडील पदभार आपल्याकडे देण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यानुसार आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी काकाणींच्या सेवा निवृत्तीनंतर संजीवकुमार यांच्याकडे अतिरिक्त कारभार देण्याची ऑर्डर काढली. मात्र, काकाणी यांच्याकडील आरोग्य विभाग पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा संजीवकुमार यांचा विचार असून या अतिरिक्त आयुक्तपदी नवीन अधिकारी आल्यास त्यांच्याकडे आरोग्य विभाग न देता इतर विभागाचा भार सोपवण्याचा विचारही सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
महापालिकेच्या या अतिरिक्त आयुक्तपदी महापालिकेच्या सेवाज्येष्ठ सहआयुक्तांची वर्णी लावण्याचाही प्रयत्न सुरु आहे. यापूर्वी पंधरा वर्षांपूर्वी उपायुक्त असलेल्या विजयसिंह पाटणकर यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लावण्यात आली होती. परंतु त्यानंतर महापालिकेच्या कोणत्याही उपायुक्त तथा सहआयुक्तपदावरील व्यक्तीची वर्णी लावण्यात आली नव्हती. परंतु पुन्हा एकदा सहआयुक्त पदावरील ज्येष्ठ अधिकाऱ्याची वर्णी लावण्याचा विचार असून तसे झाल्यास मिलिन सावंत यांचा पहिला दावा मानला जावू शकतो.
आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता कमी
मात्र, यापूर्वीच नाशिक महापालिका आयुक्तपदावर जिथे सनदी अधिकाऱ्याची वर्णी लावली जात होती, तिथे मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची आयुक्त म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच सनदी अधिकाऱ्यांची एक जागा अडवली गेल्याने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदाची जागा सहआयुक्तांमधून भरण्यास आता सनदी अधिकाऱ्यांमधून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे महापालिकेत सहआयुक्तांमधून अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.
तर सनदी अधिकाऱ्यांमधून अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता असून या पदासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे नाव अग्रक्रमावर असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी यांचे राजेश नार्वेकर हे सासरे असून महापालिकेत नार्वेकर यांच्या नियुक्तीची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community