परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ आरोपांची गोपनीय चौकशी

82

माजी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी)कडून तीन प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिस निरीक्षक बी आर घाडगे, पोलिस निरीक्षक अनुप डांगे आणि बुकी सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

काय आहेत आरोप?

अकोल्यातल्या कोतवाली पोलिस ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी पराग मणेरे आणि आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बी आर घाडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महसंचालकांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी ठाण्याचे आयुक्त असताना, परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, असा गंभीर आरोप पत्रात केला होता. तर गावदेवी पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आणि गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असल्याचा आरोप केला आहे. बुकी सोनू जालान याने परमबीर यांनी आपल्याकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. या तिघांच्याही तक्रारी पोलिस महासंचालक कार्यालयाला मिळल्यांनातर, त्या एसीबीला पाठवण्यात आल्या होत्या आणि प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

(हेही वाचाः आयपीएस अधिकाऱ्यांना परमबीर सिंग यांची का वाटते भीती? वाचा… )

तक्रारदारांचे नोंदवणार जबाब

सध्या तरी या तिन्ही प्रकरणांच्या गोपनीय चौकशीला सुरुवात झाली असून, लवकरच संबंधित तक्रारदारांना जबाबासाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही प्राथमिक स्वरुपाची चौकशी असते, जी तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडते. त्यानंतर जे पुरावे प्राथमिक चौकशीत मिळतात त्यानुसार खुली चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ठरते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.