- हिंदुस्थान पोस्ट ब्युरो
दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळी (Diwali 2023) आधीच देशभरात वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. केंद्र सरकारपासून राज्य सरकार याविषयी अत्यंत चिंतेत आहे. वाढते वायू प्रदूषण बालकांपासून वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. परिणामी कोरोना नसला तरी तोंडाला मास्क लावा, सकाळचे मॉर्निग वॉक, खुल्या मैदानात व्यायाम करणे बंद करा, सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडणे टाळा अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत या वाढत्या प्रदूषणात भर टाकणारे फटाके फोडण्याचा मोह टाळणे सर्वांच्याच आरोग्यासाठी हिताचे ठरणार आहे.
फटक्यांवर बंदी हा विषय नेहमीच चर्चेला येत असतो. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरित फटक्यांसंबंधी निर्देश दिले होते आणि रासायनिक फटाक्यांवर बंदी घातली होती. त्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या उच्च न्यायालयांनीही त्या त्या ठिकाणच्या सरकारला निर्देश दिलेले आहेत. पण तरीही दिवाळीच्या काळात प्रचंड प्रमाणात फटाके फुटताना दिसतात आणि प्रदूषणातही वाढ होते.
(हेही वाचा – Skin Donation: अवयवदानाप्रमाणे त्वचादान आणि त्वचापेढी वाढवण्याची गरज !)
फटाक्यांमुळे आकाश जरी उजळत असले तरी त्याचा परिणाम पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येतो. फटाक्यांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढत असून त्यामुळे हवा दुषित होत आहे. फटाके फुटल्यानंतर त्यातील सल्फर, झिंक, कॉपर आणि सोडियम या रसायनांनी भरलेल्या धुळीच्या कणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
फटाक्यांचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?
वायू प्रदूषण: फटाक्यांमध्ये विषारी वायू आणि रासायनिक घटक असतात. हवेशी संपर्कात आल्यानंतर हे घटक सक्रीय होतात, ज्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होते. प्रदूषणामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
जागतिक तापमानवाढ : फटाक्यांमुळे वातावरणातील उष्णतेसह कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायूंचे प्रमाण वाढते. या दूषित हवेमुळे तापमानात वाढ होते.
ध्वनी प्रदूषण : मोठ्या आवाजाचा थेट प्रभाव मानवी आयुष्यावर पडतो. यामुळे वृद्ध लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भातील बाळाच्या आरोग्यालादेखील यामुळे धोका बळावतो.
आगीच्या घटनांमध्ये वाढ : मोठी आग लागण्यासाठी एक ठिणगीदेखील पुरेशी असते. त्यामुळे फटाक्यांना योग्यरित्या न हाताळल्यास मोठ्या आगीच्या घटना घडण्याची शक्यता जास्त असते. यामुळे बाह्य नुकसानासोबतच श्वसनाच्या आजाराचाही सामना करावा लागू शकतो.
फटाक्यांचे हे दुष्परिणाम लक्षात घेवून आणि सध्या वातावरणातील वाढते प्रदूषण लक्षात घेता यंदाची दिवाळी फटक्यांशिवाय एकमेकांना गोडा धोडाचे फराळ खावू घालून साजरी करण्यात आनंद व्यक्त करणे संयुक्तिक ठरेल.
हेही वाचा-
Join Our WhatsApp Community