पालघर ‘साधू हत्याकांडा’ची काय आहे सध्यस्थिती? वाचा…

अख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावातील झुंड बळी ठरलेल्या साधू हत्याकांड हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी कडे आहे. या हत्याकांडात २५१ जणांना अटक करण्यात आली असली तरी ५६ जण अद्यापही बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी सीआयडीने स्थानिक पोलीस ठाण्याची मदत मागितली आहे. तुरुंगात असलेल्या आरोपीपैकी २८ जणांनी नुकतेच उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला असून ८ डिसेंबर रोजी त्याच्यावर सुनावणी होणार आहे.

…म्हणून गावाच्या इतिहासातील ‘हा’ काळा दिवस

राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर होता, तर दुसरीकडे संपूर्ण राज्य लॉकडाऊनमध्ये असतांना पालघर जिल्हयातील गडचिंचले गावाची देशभरात चर्चा सुरू होती. १६ एप्रिल २०२० हा दिवस गडचिंचले गावाच्या इतिहासातील काळा दिवस समजला जातो. या दिवशी दोन साधूंसह तिघेजण झुंडीचे बळी ठरले होते. दरोडेखोर समजून गडचिंचले गावातील पुरुष गावकऱ्यांनी दोन निष्पाप साधू आणि त्यांचा वाहन चालकाची क्रूरतेने हत्या केली होती. या गावकऱ्याचा या झुंडीचा सामना स्थानिक पोलिसाना देखील करावा लागला होता. गावकऱ्यांची झुंडच्या झुंड या साधूंवर तुटून पडली होती, कोणी कुणाचे ऐकत नव्हते. हा सर्व प्रकार काही जणांनी एवढ्या काळोखात देखील हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला होता. आणि या झुंड बळीचे हे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाले होते.

१०० पेक्षा अधिक आरोपीना अटक

समाज माध्यमावर या झुंडबळीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि हे प्रकरण दोन दिवसांनी सीआयडी कडे तपासासाठी सोपवण्यात आले. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण पंचनामा करून दोन साधूसह तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले होते. ज्यावेळी आरोपीना अटक करण्याची वेळ आली, त्यावेळी गावकऱ्यांच्या रोषाला स्थानिक पोलिसांना सामोरे जावे लागले होते. साधूंच्या हत्येनंतर पोलिसांनी आणखी दोन वेगळे गुन्हे दाखल केले. पोलिसांवर हल्ले करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तिन्हीही गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलिसांनी १०० पेक्षा अधिक आरोपीना अटक केली होती, आणि उर्वरित १५१ आरोपीना सीआयडीने अटक केली असे एकूण गावातील २५१ पुरुषांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यात विधीसंघर्ष बालकाचा समावेश होता.

६१ आरोपी अद्यापही तुरुंगात

सीआयडीकडून या गुन्ह्याचा तपास जलद गतीने सुरू करून दीडशे पेक्षा अधिक साक्षीदार, तसेच परिस्थिती जन्य पुराव्याच्या आधारे ११ हजार पानांचे मूळ दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यायानंतर दोन पुरवणी दोषारोप पत्रे दाखल करण्यात आली होती. दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर आरोपीना जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. आतापर्यत या प्रकरणात १९० जणांना जामीन मिळाला असून ६१ आरोपी अद्यापही तुरुंगात आहे. त्यापैकी २८ जणांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून या जामीन अर्जावर ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा – भगतसिंगांच्या फाशीला गांधींचा होता पाठिंबा! कंगना पुन्हा आक्रमक)

या गुन्हयात ५६ आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी सीआयडीने स्थानिक पोलिसांना पत्रव्यवहार करून आरोपीना अटक करण्यासाठी मदत करण्याची विनंती केलेली असल्याची माहिती सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणात अद्याप आरोप ठेवण्यात आलेले नसून लवकरच न्यायालयात हे आरोप ठेवण्यात येणार आहे.

जामिनावर बाहेर असणारे हजेरीवर

या प्रकरणात जामीवर बाहेर आलेल्या आरोपीना न्यायालयाने जामीन देण्यापूर्वी काही अटी घालून दिलेल्या आहे. त्यापैकी एक अट म्हणजे प्रत्येकाने आठवड्यातून एकदा स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावून जायची. आजही जामिनावर आलेल्या आरोपीना हजेरीसाठी आठवड्यातून एकदा पोलीस ठाण्यात यावे लागते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here