एखाद्याच्या लग्नाला किंवा वाढदिवशी तसेच, नवीन घराची पूजा असल्यास पाकिट भरताना त्यात आपण आपल्या वडिलधा-यांना ११, ५१ किंवा १००१ रुपये भरताना पाहिलेच असेल. पण पाकिटात भरल्या जाणा-या त्या वरच्या एक रुपयामागचे कारण काय? याचा कधी विचार केला आहे का? कोणत्याही शुभ कार्याला एखाद्याला भेट स्वरुपात दिल्या जाणा-या रोख रकमेत एक रुपयाचा नाणं का दिले जाते. या प्रथेची सुरुवात कुठून झाली आणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.
गणनेची सुरुवात १ पासून व्हावी म्हणून…
एखाद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आपण त्याला भेटवस्तू म्हणून पाकिट दिल्यानंतर, जेव्हा तो यजमान हे पाकिट उघडून पाहिल तेव्हा त्याच्या गणनेची सुरुवात एकपासून व्हावी, असे मानले जात असल्याने १ रुपया देण्याची प्रथा सुरु झाल्याचे मानले जाते.
१ रुपया हे एक कर्ज
आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याला पुन्हा भेटावे म्हणून १ रुपयाचे नाणे हे समोरच्या व्यक्तीला दिलेले एक छोटेसे कर्ज असते. या कर्जाच्या परतफेडीसाठी तो आपल्याला भेटायला येईल असे त्यामागचे गणित असते. ‘शगून’ च्या पाकिटावर लावलेला एक रुपया देण्याच्या निमित्ताने त्या दोन व्यक्ती पुन्हा भेटतील आणि त्यांच्यातील मैत्रीचा धागा अजून पक्का होईल ही भावना सुद्धा व्यक्तीच्या मनात असावी असेही म्हटले जाते.
भेट विभागली जाऊ नये म्हणून…
आपल्या प्रिय व्यक्तीला भेटस्वरुपात दिलेली रक्कम ही विभागली जाऊ नये म्हणून देखील रुपये १०१, २०१, ५०१ ही रक्कम दिली जात असल्याचे सांगितले जाते.
( हेही वाचा: गुन्हेगाराला ‘गुंडा’ का बोलतात माहितीय का? वाचा ‘गुंडा’ या शब्दाच्या उत्पत्तीची भन्नाट जन्मकथा )
तो रुपया कुठेतरी गुंतवावा म्हणून
समोरच्या व्यक्तीने हा एक रुपया कुठेतरी गुंतवावा किंवा दान करावा आणि त्याच्या हातून सत्कर्म व्हावे ही देणा-याची इच्छा असते. तसेच, आपल्या प्रियजनांना भेट देण्याचे कारण कोणतेही असो, तो आनंदी रहावा आणि त्याच्या सुखात वाढ व्हावी हा या १ रुपया देण्यामागचा हेतू असतो.
Join Our WhatsApp Community