सध्या स्मार्टफोन उत्पादक ई-सिम स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी भविष्यातील तंत्रज्ञान मानले जाणारे ई-सिम आता मुख्य प्रवाहात येत असल्याने भारतासारख्या देशातही काही कंपन्या ई-सिम सेवा पुरवत आहेत. हे एम्बेडेड सिम ग्राहकांना ओळखण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी वापरण्यात येणारी माहिती संग्रहित करते. हे सिम फोनमधून काढले जाऊ शकत नाही. ई-सिम बदलण्यासाठी सिम ट्रे उघडण्याची गरज नाही. त्याऐवजी नेटवर्क पुरवठादाराला फोन करावा लागेल, क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
eSIM म्हणजे काय?
ई-सिम चे पूर्ण फॉर्म एम्बेडेड सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल आहे जे तुमच्या फोन, स्मार्टवॉच किंवा टॅबलेटमध्ये एम्बेड केलेले आहे. वास्तविक, इतर सिम कार्डांप्रमाणे फोनमध्ये ई-सिम घालता येत नाही. फोनची निर्मिती करतानाच कंपनी ई-सिम तयार करते. हे सिम फोनच्या हार्डवेअरमध्येच येते. यामुळे फोनची जागा वाचते तसेच वेगळा सिम ट्रे बनवण्याची गरज भासत नाही. दरम्यान, आजकाल अनेक फोनमध्ये अशा ई-सिमचा ट्रेंड सुरू आहे.
(हेही वाचा – दाऊद आणि पाकिस्तानमधील गँगशी ‘त्या’ महिलेचे संबंध, NIA कडून तपास करा; राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण)
हे आहेत ई-सिमचे फायदे
- ऑपरेटर बदलता तेव्हा सिम कार्ड बदलण्याची गरज नाही
- एका ई-सिमवर अन्य व्हर्च्युअल सिम कार्ड साठवता येतात
- एका नेटवर्कवर समस्या असल्यास दुसरे नेटवर्क स्वीच करणे सोयिस्कर होते
- डिव्हाइस चोरी गेला तर गुन्हेगाराला तुमचे सिम काढणे कठीण होईल, या उलट त्याला ट्रॅक करणे सोपे होईल.