मोबाईल फोन हे यंत्र नसून सध्या माणसाच्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव झाला आहे. आता एका किडणीवर माणूस एक वेळ जगू शकतो पण एक मोबाईल नसेल, तर माणसाला जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे हे अवयवरुपी यंत्र चोरीला गेल्यानंतर माणसाची अवस्था प्राण नसलेल्या यंत्रमानवासारखी होते. असा हा मोबाईल फोन चोरीला गेल्यावर तो पुन्हा मिळेल की नाही याची शक्यता खूपच कमी. तुमचा चोरलेला फोन कुठे असेल, तो कोण वापरत असेल असे प्रश्न अनेकांना स्वप्नातही पडत असतील. आपण विचार करतो की चोरीला गेलेला आपला फोन कुठल्यातरी गर्दुल्ल्यांच्या हातात असेल. पण हे चोरीला गेलेले फोन देशाबाहेर वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुठे जातात मोबाईल?
बांग्लादेश, नेपाळ या देशांत भारतातील महागड्या फोनना मोठी मागणी आहे. त्यासाठी भारतातील मुख्य शहरांमध्ये मोबाईल चोरी आणि विकत घेणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या दोन्ही देशांत नवीन महागडे स्मार्ट फोन घेणारे खूप कमी नागरिक असल्यामुळे या ठिकाणी जुने, वापरलेले मोबाईल फोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. त्यामुळे जुन्या, वापरलेल्या परंतु चालू स्थितीत असणाऱ्या फोनना मोठी मागणी असल्यामुळे जुने फोन विकत घेणाऱ्या आणि विकणाऱ्या टोळ्या याठिकाणी कार्यरत आहेत.
असे आहे नेटवर्क
नेपाळ आणि बांग्लादेश मध्ये असणाऱ्या या टोळ्यांनी भारतात जुने मोबाईल विकत घेणारे, तसेच चोरीचे मोबाईल फोन विकत घेणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी केली आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांची संख्या मोठी असून, या टोळ्या मुंबईतील विविध भागांत कार्यरत आहेत. चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या टोळ्यांनी मोबाईल चोरांना हाताशी धरले आहे. या टोळ्या बेकायदेशीररित्या चोरीचे मोबाईल घेऊन कुरियर कंपनीच्या माध्यमातून, तर कधी या टोळीतील एक व्यक्ती चोरीच्या मोबाईलची डिलिव्हरी पोहोचवण्याचे काम या देशाच्या सीमेपर्यंत करतात. त्यानंतर तेथील टोळी चोरट्या मार्गाने सीमारेषेच्या बाहेर हे चोरीचे मोबाईल या दोन्ही देशांत आणून, त्याची कमी किंमतीत विक्री करतात. दोन वर्षांपूर्वी विलेपार्ले पोलिसांनी अशाच एका टोळीचा छडा लावला होता, या टोळीच्या चौकशीत ही सर्व माहिती समोर आली होती.
देशाबाहेर जाणारे मोबाईल शोधणे अवघड
चोरलेला मोबाईल फोन एकदा का देशाच्या बाहेर गेला तर तो शोधून काढणे पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे गुन्ह्याची उकल होण्यास अथवा चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यास पोलिसांना अडचणी येतात. राज्यांतर्गत चोरीचे मोबाईल वापरणाऱ्याचा छडा लागतो, मात्र तोच मोबाईल सीमेपलीकडे गेल्यानंतर त्याचा तपास घेणे अवघड होऊन बसते आणि जरी छडा लागलाच तर सीमेपलीकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यास अनेक अडचणी येतात. मुंबईत दिवसाला दोनशे पेक्षा अधिक मोबाईल फोन चोरीला जातात. त्यापैकी २० ते ३० टक्के मोबाईल फोन चोरीचे गुन्हे उघडकीस येतात. मोबाईल चोराला गुन्हा करताना जागेवर अटक केली तर मोबाईल फोन सापडतात. मात्र गुन्हा घडून अनेक दिवस लोटून गेल्यानंतर मोबाईल चोर सापडला, तर मात्र चोरीला गेलेला मुद्देमाल मिळण्याची शक्यता खूप कमी असते.
प्रत्येक मोबाईल मागे चोराला किती पैसे मिळतात?
ट्रेन, बेस्ट बस, सार्वजनिक वाहतूक अथवा रस्त्यांवर मोबाईल चोरी करणारे अनेक टोळ्या शहरात कार्यरत आहेत. या टोळ्यांतील प्रत्येक चोर दिवसाला ३ ते ४ मोबाईल फोनची चोरी करतात. त्याला प्रत्येक मोबाईल फोन मागे २ हजार ते ४ हजार रुपये मिळतात. म्हणजे एक मोबाईल चोर दिवसाला ८ हजार ते २० हजार रुपयांची कमाई करतो. प्रत्येक मोबाईल चोराला आपल्याकडे खेचण्यासाठी चोरीचे फोन विकत घेणाऱ्या टोळ्यांमध्ये चुरस लागलेली असते. या टोळ्यांकडून या चोरांना ऑफर देण्यात येते. ज्या टोळीची ऑफर चांगली त्याच टोळीला चोरीचे मोबाईल विकले जातात, अशी माहिती मुंबई पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने दिली.
Join Our WhatsApp Community