औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका गर्भवती गायीच्या पोटात तब्बल ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी गायीच्या पोटातून हे ५० किलो प्लास्टिक यशस्वीरित्या काढले आहे. या गायीचे मालक बद्रीनाथ लिपाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायीवर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर ही गाय आता ठणठणीत असल्याचे सांगितले आहे.
काय आहे घटना
पैठण येथील कारकीन गावातील बद्रीनाथ लिपाने यांच्याकडे एक गाय असून ती गर्भवती आहे. सध्या या गायीला सातवा महिना सुरू असून ती एकाच जागेवर बसून आहे. काही दिवसांपूर्वी तिला पोटफुगीचा त्रास असल्याने तिला त्रास जाणवत असल्याचा संशय व्यक्त करत लिपाने यांनी जनावरांच्या डॉक्टरांना गायीवर उपचार करण्यासाठी बोलावले.
(हेही वाचा – व्हॉट्सअॅपवर एका क्लिकवर मिळणार LIC च्या सुविधा! कसे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
या गायीवर उपचार करण्यासाठी लिपाने यांनी ढोरकीन येथील शासकीय पशुवैद्यकीय सर्जन डॉ भारत डिघोळे यांना माहिती देऊन उपचारासाठी बोलावले. यावेळी डॉक्टरांनी गायीची तपासणी केली असता तिच्या पोटात काहीतर असल्याचा संशय त्यांना आला. यानंतर त्यांनी गायीवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. लिपाने यांनी देखील होकार दिला आणि गायीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियानंतर गाईच्या पोटात तब्बल 50 किलो प्लास्टिकच्या पिशव्या आणि खराब चारवट आढळून आले.
Join Our WhatsApp Community