मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रविवारी समाजमाध्यमांवरुन विनाकारण आरोग्य चाचण्या करायला लावणाऱ्या डॉक्टरांना समज दिली. रुग्णांना वस्तू म्हणून वापरु नका, असेही ते म्हणाले. पांडे यांच्या या वक्तव्यावर डॉक्टरांच्या संघटनेने खेद व्यक्त केला आहे.
आयुक्त संजय पांडे यांच्यावर पत्राद्वारे टीका
काही मूठभर डॉक्टरांच्या वागणूकीमुळे सर्वच डॉक्टर्स वाईट नसतात. वैद्यकीय व्यवसाय हा समाजात मानाचा समजला जातो. बहुतेक डॉक्टर्स रुग्णसेवा देताना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतात. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांचे वक्तव्य खेदजनक असल्याची प्रतिक्रिया भारतीय युरोलॉजी सोसायटीच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ. जे जी लालमानी यांनी दिली. पांडे यांना डॉ. लालमलानी यांनी लिहिलेल्या पत्रात कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांच्या खडतर काळात हजारांहून अधिक डॉक्टर्स रुग्णसेवा देतानाच दगावल्याची आठवण करुन दिली. सद्सदविवेकबुद्धी बाजूला सारुन तुम्ही डॉक्टरांबाबत वक्तव्ये करत आहात, या शब्दांत डॉ. लालमलानी यांनी संजय पांडे यांच्यावर पत्राद्वारे टीका केली.
( हेही वाचा : सरकार न्यायालयात म्हणाले, एसटीचे विलिनीकरण अशक्यच, संप बेकायदेशीर )
भारतीय वैद्यकीय संघटनेच्या महाराष्ट्र शाखेनेचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे यांनीही देशभरातील वैद्यकीय सेवा ही मुळात वैद्यकीय काऊन्सिलच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालते, त्यामुळे प्रत्येक रुग्णाला वयोमानानुसार उपचार देताना डॉक्टरांना उपचारपद्धतीही बदलाव्या लागतात, अशी माहिती दिली. ७० वर्षीय रुग्णाची आणि तरुण रुग्णाची उपचारपद्धती सारखी असूच शकत नाही. काही रुग्णांना जास्त तपासणीही आवश्यक ठरू शकते. कोविडकाळात रुग्णसेवा देणाऱ्या ज्या डॉक्टरांनी जीव गमावला त्या डॉक्टरांच्या परिवाराला अद्यापही ५० लाखांची नुकसानभरपाई मिळाली नसल्याची आठवण डॉ पिंगळे यांनी करुन दिली. सरकारनेच डॉक्टरांना वस्तू म्हणून वापरुन घेतले, असा उलटा टोला डॉ पिंगळे यांनी लगावला.
Join Our WhatsApp Community