पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लाखोंची रोकड घेऊन बळी मागणाऱ्या तंत्रिकासह पाच जणांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बांधकाम व्यवसायिकाकडून या तांत्रिकाने आणि त्याच्या चेल्यांनी ५६ लाख रुपयांच्या रोकडसह पोबारा केला आहे.
डोंबिवली पूर्वेतील चोळेगाव येथे रेंद्र पाटील यांचा बांधकामाचा व्यवसाय असून, पाटीदार भवन या ठिकाणी एका इमारतीत पाटील यांचे कार्यालय आहे. पाटील यांच्या ओळखीतील महेश नावाच्या व्यक्तीने महिन्याभरापूर्वी त्याच्या ओळखीचे काही व्यक्ती तांत्रिक शक्तीचा वापर करून पैशांचा पाऊस पाडतात असे सांगितले होते.
५६ लाखांचे ५६ कोटी होतील
महिन्याभराने पाटील यांनी पैशांचा पाऊस पाडण्याची इच्छा महेश याच्याजवळ व्यक्त केली. महेश याने ठाण्यातील वागळे इस्टेट येथे राहणारे अशोक गायकवाड यांच्यासोबत पाटील यांची ओळख करून दिली. गायकवाड याने माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, ते पैशांचा पाऊस पडतात असे सांगून कसारा येथे राहणा-या रमेश मोकळे नावाच्या व्यक्तीची भेट घालून दिली. रमेश मोकळे यांनी गणेश शर्मा आणि गुरुजी यांची भेट करून पैशांचा पाऊस कुठे पाडायचा आहे? असे विचारले असता माझ्या कार्यालयात हे कार्य करण्याची तयारी बांधकाम व्यवसायिक पाटील यांनी दर्शवली. गणेश शर्मा याने पूजेसाठी लागणाऱ्या सामानाची यादी तसेच ५६ लाख रुपयांची जुळवाजुळव करण्यास सांगितली. ५६ लाखांचे ५६ कोटी होतील, असे त्याने पाटील यांना सांगितले.
पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पाटील यांनी घरातील दागदागिने विकून ५६ लाख रुपयांची जुळवाजुळव केली. २४ जून रोजी सायंकाळी सर्वजण पाटील यांच्या कार्यालयात गोळा झाले व त्यांनी पूजेची सुरुवात केली. पाटील यांच्या जवळील ५६ लाखांची रोकड एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवली. काही वेळाने गणेश शर्मा नावाच्या गुरुजीने बळी द्यावा लागेल, असे सांगून रोकड असलेले लाल रंगाचे गाठोडे घेऊन गणेश शर्मा हा बाहेरच्या खोलीत पूजा करण्यासाठी आला व मला एकट्याला पूजा करावी लागेल तुम्ही आतल्या खोलीत थांबा, असे सांगून बाहेरच्या खोलीत येऊन आतल्या खोलीचे दार बंद करून घेतले. बराच वेळ होऊन पूजा संपत नाही किंवा बाहेर काही हालचाल होत नसल्यामुळे पाटील यांना संशय आला व त्यांनी बाहेर पाहिले तर गुरुजी व इतर लोक पैशांच्या गाठोड्यांसह गायब झाले होते. पाटील यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ न शकल्याने, आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. मानपाडा पोलिसांनी तक्रार दाखल करून पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community