कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात जेवणाच्या थाळीचा दर ३९ रुपयांनी वाढला

150

कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कांदिवली शताब्दी रुग्णालय) रुग्णालयातील आंतर रुग्णांना जेवणासह नाश्त्याचा पुरवठा करण्यासाठी आता नवीन कॅटरर्सची निवड करण्यात आली आहे. या रुग्णालयात आता जेवणासह नाश्त्याचा पुरवठा करण्यासाठी सत्कार कॅटरर्सची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रति दिन प्रति रुग्ण ९० रुपयांमध्ये केला जाणाऱ्या जेवणाच्या पुरवठ्यासाठी नवीन संस्थेची निवड करताना चक्क १२९ रुपये एवढा दर देऊ केला आहे. त्यामुळे एका रुग्णासाठी केल्या जाणाऱ्या खर्चासाठी मागील दरापेक्षा ३९ रुपये अधिक मोजले जाणार असून कोविड काळात या कॅटरर्सने दाखवलेल्या दानशूरपणाचा भार अशाप्रकारे अधिक दर देऊन भरुन काढण्याचा प्रशासनाचा विचार तर नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी महापालिकेच्या मंड्यांमध्ये जागा)

कांदिवली शताब्दी अर्थात महापालिकेच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील आंतररुग्णांना थाळी पध्दतीने चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी चहा,नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा कालावधी मे २०२२रोजी संपुष्टात आला आहे. याच्या पुरवठ्यासाठी ऑगस्ट २०१९पासून नियुक्त केलेल्या विनिता कॅटरर्सची मुदत मे २०२२मध्ये संपुष्टात आली. या वनिता कॅटरर्सच्या माध्यमातून प्रती दिन, प्रति रुग्णाच्या दोन्ही वेळच्या जेवण, नाश्त्यासाठी ९० रुपये खर्च केले जात होते. परंतु या रुगालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या निविदेमध्ये महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा ५० टक्के अधिक बोली लावण्यात आली आहे. यामध्ये प्रति दिन, प्रति रुग्ण १२९ रुपये एवढा दर आकारणारी सत्कार कॅटरर्स ही संस्था पात्र ठरली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत थाळी पध्दतीच्या जेवणासाठी नियुक्त केलेल्या संस्थेला यंदापासून ३९ रुपये अधिक मोजले जाणार आहे. अकरा महिन्यांनुसार पुढील तीन वर्षांकरता या कंत्राटदाराची निवड करण्यात आलेली आहे. वर्षाला दीड कोटी रुपयांप्रमाणे तीन वर्षांकरता साडेचार कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रस्तावाला प्रशासकांनी मान्यता दिली असून लवकरच या संस्थेच्या माध्यमातून या थाळीचा पुरवठा केला जाणार आहे. तर सध्या जुन्याच संस्थेकडून याचा पुरवठा केला जात आहे.

या रुग्णालयांमध्ये ४४४ खाटांची क्षमता असून दैनंदिन सरासरी ३५० आंतर रुग्ण दाखल असतात. या आंतररुग्णांना थाळी पध्दतीने आवश्यकतेनुसार विशिष्ट प्रकारचे जेवण पुरवले जाते. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा दर मागील कंत्राटदार पुरवत असलेल्या दरापेक्षा ४३.३४ टक्के अधिक आहे. पण तीन वर्षांमध्ये वाढलेला वाहतूक दर व महागाई लक्षात घेता हा दर बाजारभावाच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोविड काळात या संस्थेने विविध साहित्यांसह, पीपीई किट, निवास व्यवस्था आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचे पुरवठा आदींची मदत महापालिकेला केली होती. यामध्ये सत्कार कॅटरर्सने पौष्टिक आहार पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्याची परतफेड अशा माध्यमातून महापालिका करत आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.