डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करावी: संजीव जयस्वाल

अनुयायांनी देखील जयंतीदिनी शक्यतो आपआपल्या घरी थांबूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त जयस्वाल यांनी या निमित्ताने केले आहे.

220

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दादर परिसरातील चैत्यभूमी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच या परिसरात येणा-या अनुयायांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवा-सुविधा देखील पुरविण्यात येतात. यंदा कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जयंती कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अनुयायांनी देखील जयंतीदिनी शक्यतो आपआपल्या घरी थांबूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त जयस्वाल यांनी या निमित्ताने केले आहे.

घेतली आढावा बैठक

येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात एका विशेष बैठकीचे आयोजन मंगळवारी महापालिका मुख्यालयात करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयस्वाल बोलत होते. या बैठकीला परिमंडळ–२चे उपायुक्त विजय बालमवार, संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त, घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर, संचालक(वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महेंद्र साळवी, नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचाः कारवाईचा बडगा दाखवताच २८ वर्षांचा मालमत्ता कर वसूल!)

अनुयायांना घरी राहून अभिवादन करण्याचे आवाहन

६ डिसेंबर २०२० रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी ज्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली होती, त्याच धर्तीवर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये प्रामुख्याने चैत्यभूमी येथे होणा-या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण, दूरदर्शनसह विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे करण्यात येणारे थेट प्रक्षेपण आदी बाबींविषयक नियोजन करावे. जेणेकरुन अधिकाधिक नागरिकांना आपल्या घरी थांबूनच अभिवादन करणे शक्य होऊ शकेल. तसेच या अनुषंगाने आपआपल्या घरी राहूनच अभिवादन करण्याबाबत अनुयायांना विनंती करावी, असेही आजच्या बैठकीत जयस्वाल यांनी महापालिकेच्या संबंधित अधिका-यांना आवर्जून निर्देशित केले आहे.

पूर्वतयारीची माहिती

या बैठकीत चैत्यभूमी येथे जयंती दिनी करण्यात येणा-या व्यवस्थेबाबत संगणकीय सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने चैत्यभूमी येथील अशोक स्तंभाजवळ शामियाना व स्वागत कक्ष, परिसराचे सुव्यवस्थित परिरक्षण व सुशोभीकरण, फुलांची सजावट व पुष्पचक्र व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व प्रसाधन गृहांची व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, अग्निशमन दल व्यवस्था, विद्युत व्यवस्था इत्यादी बाबींच्या पूर्वतयारीची माहिती बैठकी दरम्यान देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.