बेड्यांचे टाळ जैं झालें !

171

तुकोबा, ज्ञानोबा नि विठोबा मराठी मनाला सावरणारे, घडविणारे, फुलविणारे तीन वेगळे वाटणारे, तरी अविच्छिन्नपणे एकच असणारे मानबिंदू आहेत. गंगा-यमुनेच्या संगमात सरस्वतीचा प्रवाह जसा गुप्तपणे वास करतो, तसाच मराठी मनात या तिहींचा प्रवाह सहजच वास करत असतो. सुखाच्या क्षणी ते आठवतातच पण दुःखाच्या, वेदनेच्या क्षणी तर हटकूनच आठवतात. त्याला मराठमोळे सावरकर तरी कसे अपवाद ठरणार?

पारतंत्र्याच्या व्यथेने दुःखी झालेल्या सावरकरांना बालपणापासूनच तुकोबा, ज्ञानोबांचा व्यासंग जडला होता. नव्हे नव्हे; त्यांच्यामुळेच परवशतेचे दुःख, व्यथा कळत होती, डाचत होती. दोहोंच्या साहित्याचा अभ्यास सावरकरांच्या मित्रमेळ्यात आवर्जून केला जाई. (माझ्या आठवणी पृ. २३३) सशस्त्र क्रांतिकार्याचे प्रवृत्तीपूर्ण तरीही वैराग्यमय व्रत आचरणा-या सावरकर आणि त्यांच्या सहका-यांना तुकोबांची अमरवाणी स्फूर्तिदायी ठरणारी होती.

‘पिंडीवरी विंचू आला । देवपुजा नावडे त्याला ।।
तेथे पैजारेचे काम । अधमासी तो अधम ।। ’

हा तुकोबांनी सांगितलेला रोकडा व्यवहार असो की

‘भले तरी देऊ कांसेची लंगोटी।
नाठाळाचे काठी देऊ माथा ।’

सारखा सूत्रबध्द मार्ग असो; दोन्हीही त्यांना उपयुक्तच वाटत होते. अन ‘रत्न सोने आम्हा मृत्तिकेसमान’ गणणा-या तुकोबांचा आदर्श त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या विराण जीवनाला वैराग्याचा जरीपटकाच चढविणारा होता. याशिवाय ज्ञानेशाने ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।’ची धरलेली आंस नि तुकोबाची ‘अमुचा स्वदेश। भुवनत्रयामधी वास!’ची विशाल भावना त्यांच्यासारख्या स्वातंत्र्याकांक्षी देशभक्तांसाठी चैतन्याचा अखंड झराच होती. येथे लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे श्रीसंत तुकाराम महाराजांच्या अभंगातील याच ओळीने सावरकर त्यांच्या हिंदुत्व या जगद्विख्यात ग्रंथाचा समारोप करतात. आणि हो, जीवनाचा समारोप सुध्दा ‘आम्ही जातो अमुच्या गांवा। अमुचा रामराम घ्यावा।।’ या तुकोबांच्या पंक्तींनीच करताना दिसतात. याचाच अर्थ सावरकरांच्या जीवनात तुकोबांचे स्थान प्रत्येक वळणावर आहे.

डोंगरीच्या तुरुंगात असताना कुणीतरी अधिका-याने येऊन सावरकरांना सांगितले की, ‘हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तुमच्या विरुध्द लागलाय. त्यामुळे पन्नास वर्षे जन्मठेपेची शिक्षा तुम्हाला लागू झालेली आहे.’

चेह-यावर खिन्नता, हताशता इ. चे कोणतेही भाव उमटू न देता सावरकरांनी ते धीराने ऐकून घेतले. पण एकांतात मात्र त्यांच्या मनात पन्नासचा आकडा पुनःपुन्हा तरंगू लागला. कल्पना करा! अठ्ठावीस वर्षाच्या युवकाला, त्याच्या वयाच्या जवळपास दुप्पट वर्षे तुरुंगात काढावयाची आहेत. एक दोन वर्षात जग केवढे बदलते? दहा वीस वर्षांनी तर ओळखूही येत नाही. अन या युवकाला सुमारे पन्नास वर्षे काळकोठडीत काढायची आहेत. कर्मधर्म संयोगाने हा वाचलाच तर तुरुंगातून बाहेर पडताना त्याचे वय असेल सुमारे अठ्याहत्तर वर्षे! या नुसत्या कल्पनेनेच त्या ति-हाईत इंग्रजी अधिका-याच्या अंगावरसुध्दा शहारे आले.

सावरकरांच्या संवेदनशील नि तरल मनात मात्र काही दिवस ‘पन्नास वर्षे’ या शब्दांनी खळबळ उडवून दिली. त्याचेच प्रतिबिंब सप्तर्षी या दीर्घकाव्याच्या पूर्वार्धात पडलेले दिसते. (माझी जन्मठेप पृ. ११) त्याविषयी सावरकर स्वतः लिहीतात,

‘वर्षे पन्नास !’ परी ऐकुनि उत्साह तोहि कोसळला ।
सुकला तरंग अंतिम होता जो मृगजळांत सळसळला !!

किती चपखल नि तितकेच विदीर्ण करणारे वर्णन आहे हे! काळ्या पाण्यावर पन्नास वर्षे शिक्षा भोगून जिवंत परत येणे, मृगजळासारखीच खोटी आशा धरणारे. त्यामुळे मन उदास, हताश झाले. याला सावरकर कोसळणे असा सूचक शब्दप्रयोग करतात. या हताश मनाला स्फूर्ती देण्यासाठी सावरकर सर्वप्रथम गोरोबांचे कच्चे मडके तपासणाऱ्या मुक्ताबाईंना आठवतात. बंदित सर्व बंधनातीत असणारी मुक्ताच सर्वप्रथम आठवणार. निष्काम कर्मयोगाचा मार्ग दाखविणा-या श्रीकृष्णाचे तत्वज्ञान त्यांना आठवते, रामाचा वनवास आठवतो. पण त्यात सीता त्याच्यासोबत होती, इथे आपण एकटेच आहोत ही तीव्र वेदना जाणवते. रामाचा वनवास चौदा वर्षांचा नि आपला त्याहून साडेतीनपट मोठा हेही स्मरत असावे. याच मनस्थितीत त्यांना योग सूत्रकार आठवतात, सांख्य वेदांतिक आठवतात, भगवान श्रीरामकृष्ण परमहंस नि विवेकानंद आठवतात, भगवान बुध्द आठवतात. नीट बघा प्रताप, शिवबा, रामदास, दयानंद नाही आठवत. सहा सोनेरी पानातील एकही राजा नाही आठवत. कारण त्या बंदीत हे सारे उपयोगी नाहीत. तर परतत्वाचा स्पर्श झालेले, व्यथा वेदनेला मानसिक जगात बुडवून टाकणारेच कामाचे होत. या सा-यांच्या स्मरणातून नि स्वानुभावातून ते स्वतःला सांगतात की,

‘उमजेल तरि तुला की बाह्यनिधीमधिं वसे न सुखधन ते ।’

‘जगात खरे सुख बाह्यवस्तूत नसून मानसिक समाधानात असते.’ हा सिध्दांत सावरकर स्वतःला समजावतात. तेव्हा त्यामागे ‘ठेविले अनंते तसैची रहावे।’ चे तुकोबांचे वचन नसेलच, असे कसे म्हणता येईल? साहजिकच त्यांना नैराश्याच्या झाकणाखाली सुखनिधान लपविणा-या तुकयाची आठवण होते. तुकयाचे हे नैराश्य आशानिराशेच्या व्दंव्दातीत आहे. क्षणभर सावरकर त्यात रमतात न रमतात, तोच तो विचार पुन्हा उफाळून येतो. विकल मनाला वश करायला ते नासाग्र दृष्टी लावून बसतात. पण चित्त एकाग्र होतंच नाही. तितक्यात सूर्य मावळून रात्र व्हायला लागते. एकाच वेळी बाहेर नि मनात अंधःकार दाटून येतो. त्यातून सावरण्यासाठी सावरकर ९ बाय ५ च्या कोंदट नि
अंधा-या खोलीत येरझा-या घालू लागतात. त्यांच्या हाता-पायांतले साखळदंड आपसूक वाजू लागतात, सावरकर तुकोबांचे अभंग गुणगुणू लागतात, नकळत ताल धरल्याने त्यांच्या साखळदंडाचे टाळ होतात. याविषयी स्वतः सावरकर लिहीतात,

त्या तुकयाच्या भावे भक्तिरसपरिप्लुता अभंगा या।
लागे, व्यायामा मी फिरता नवपद बिळात त्या, गाया ।।
दंडाबेडीचे जे वाळे ते टाळ करुनिया नामी ।
भजना त्या गुणगुणता वाजविले ताल धरुनि यांना मी ।। (सप्तर्षि १३१)

सावरकरांनी केलेले हे त्या रात्रीचे वर्णन अंदमानातील त्यांच्या दुस-या एखाद्या रात्रीलाही लागू होत नसावे असे कसे म्हणता येईल? चौदा वर्षांच्या तुरुंगवासातील अदमासे पाच हजार रात्रीत हताशतेचे असे क्षण कितीदा तरी आले असतील. कितीदा तरी कित्येक संतमहंतांची वचने बेडीच्या तालावर गायिली गेली असतील. पण रोजचेच वर्णन कोण करणार? येथे हे स्पष्ट करावेसे वाटते की, सप्तर्षि ह्या सावरकरांच्या काव्याचा आशय अत्यंत सघन नि सचेतन आहे. भयाण, अमानुष आपत्तीस धैर्याने तोंड देणारी मानसिकता महापुरुष कशी विकसित करीत असतो, याचा तो अद्भुत वस्तुपाठच आहे. लेखकाने प्रस्तुत कवितेचे रसग्रहण करण्याच्या मिषाने जेंव्हा ती कविता अभ्यासली होती. तेंव्हा तीत अधोरेखित केलेल्या पंक्तीत उपरोल्लेखित पंक्ती नव्हत्या. म्हणजेच यापेक्षा अन्य पंक्ती महत्त्वाच्या वाटाव्या इतक्या त्या सामान्य आहेत. यावरुन प्रस्तुत कवितेची प्रगाढता ध्यानी यावी असो !
‘कारागृहात असताना सावरकर तुकोबांचे अभंग बेड्यांच्या चिपळ्या करत गात होते.’ असे मोदींनी म्हटल्याने ज्यांचा पोटशूळ उठला व पुराव्याच्या मागण्या होऊ लागल्या, त्यांना न मानसशास्त्राची जाण आहे, न मनोव्यापाराची कल्पना आहे. अहो! सावरकरांचे सोडून द्या पण आपणही जेंव्हा सांसारिक आपत्तीत सापडतो, एकटे पडलेलो असतो तेंव्हा संतांची वाणी वा धीर देणारे सिनेमातील गीत आपल्याला आठवते, कळत नकळत ते गुणगुणतांना, आपल्या हातातील चमचे नि थाळ्या ताल धरु लागतात, जणू काही त्याच्या टाळ-चिपळ्या होतात. मग हे तुरुंगात शिक्षा भोगणा-या सावरकरांच्या बाबतीत असंभव कसे ठरणार ?
येथे हेही ध्यानी असू द्यावे की, तुकोबाचे अभंगच नव्हे तर रामदासाचे मनाचे श्लोक, करुणाष्टके, नामदेव, एकनाथाचे अभंग, गुरु गोविंदांची वाणी कधी ना कधी सावरकरांना धीर द्यायला कोणत्या न कोणत्या भयाण रात्री अवतरली असेल. सावरकरांनीच नव्हे तर वासुदेव बळवंत फडके, चापेकर, राजगुरु, पिंगळे, टिळक अशा अनेक मराठी बंदीजनांनी आपापल्या कारावासात तुकोबा, ज्ञानोबाला कधी ना कधी आळविलेच असेल, आळवता आळवता बेडीचे टाळही वाजविले असतील. त्याची लेखी नोंद नसली म्हणून काय झाले? तीच गोष्ट कबीर, चैतन्य, नानकादिंना आळविणा-या अमराठी देशभक्तांची होय. याचा सावरकरांशिवाय असणारा आणखी एक उत्तम पुरावा म्हणजे हुतात्मा अश्फाक उल्ला खा वारसीचे हे वक्तव्य, यात ते म्हणतात,

बेडी की झनझन में विणा की लय हो ।
हे मातृभूमी तेरी जय हो। सदा विजय हो ।

खरंच देशभक्तांना बंदीस्त करणा-या बेड्यांची झणझण, जेंव्हा टाळ चिपळ्यांत बदलते नि तिला वीतराग साधुसंतांच्या अभंग वाणीचा परिसस्पर्श होतो. तेंव्हा कळत-नकळत मन उन्नत होत जाते, वेदनादायी परिस्थिती क्षणभर कः पदार्थ वाटू लागून, हुतात्म्याचे धैर्य मणभर वाढते. त्याला दिव्यत्वाचा स्पर्श झाल्याने ते अलौकीक तेजाने तळपू लागते. येणा-या पिढ्यांसाठी दिशादर्शक बनते, आपत्तीत अदम्य साहसाने ऊभे राहण्याची स्फूर्ती देते, यात शंकाच नाही.

(टीप : सावरकर साहित्यात बेड्यांच्या चिपळ्या झाल्या याला सबळ पुरावा मिळाला म्हणून बरे. नाही तर आरोपांची राळ शमता शमली नसती. दोष आरोप करणा-यांचा नाही त्यांच्या विखारी नि विकृत मानसिकतेचा आहे. त्यांना या वा अशा सप्रमाण उत्तरांनी फारसा फरक पडणारा नाही याची जाण लेखकाला अवश्य आहे.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.