डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड!

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

दिल्ली आयआयटी येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेले डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

२००२ पासून दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत! 

 ७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ. राजेंद्र कुमार शर्मा (जन्म – २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पद्व्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रांस व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ. शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन २००२ पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

(हेही वाचा : कोरोना काळात मदतकार्य करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार )

अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव!  

१ जानेवारी २०१९ रोजी त्यांची स्वित्झर्लंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ सोशल एंड इकोनोमिक चेंज, बंगळूर येथील संचालक डॉ. एस माधेश्वरन व शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here