मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या घरात 25 लाखांचा झगमगाट!

110

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या कलिना येथील निवासस्थानाचे वीज बिल लाखोंच्या घरात येत असून मागील 11 वर्षांत एकूण 25 लाख 25 हजार 272 रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे, तर एकूण बिलाच्या निम्म्याहून अधिक बिल हे विद्यमान कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांचे असून मागील 4 वर्षांत त्यांनी 13 लाखांची वीज वापरली आहे. मागील 3 कुलगुरुंच्या तुलनेत वीज बिल वापरात डॉ. सुहास पेडणेकर यांची आघाडी आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या एका आगारातील सर्व कर्मचाऱ्यांची केली बदली? काय आहे कारण… )

मुंबई विद्यापीठाच्या वीज बिलाची आकडेवारी

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या निवासस्थानी वापरण्यात आलेल्या विजेच्या बिलासंदर्भात आणि अन्य माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाने वर्ष 2011 पासून 2021 या 11 वर्षांतील वीज बिलाची आकडेवारी दिली. मागील 11 वर्षांत 25 लाख 25 हजार 272 रुपये वीज बिलावर खर्च झाले आहेत. या 11 वर्षांत डॉ. राजन वेळूकर, डॉ. संजय देशमुख आणि डॉ. सुहास पेडणेकर असे 3 कुलगुरु मुंबई विद्यापीठास लाभले. डॉ. वेळूकर आणि डॉ. देशमुख यांचा 7 वर्षांच्या कार्यकाळात जितक्या रक्कमेची वीज वापरली गेली त्याहून अधिक रक्कमेची वीज मागील 4 वर्षांत डॉ. सुहास पेडणेकर हे वापरत आहेत.

फक्त 4 वर्षांत 13 लाखांची वीज

डॉ. वेळूकर आणि डॉ. देशमुख यांच्या कारकिर्दीत वर्ष 2011 मध्ये 1.51 लाख, वर्ष 2012 मध्ये 1.54 लाख, वर्ष 2013 मध्ये 1.82 लाख, वर्ष 2014 मध्ये 2.42 लाख, वर्ष 2015 मध्ये 1.71 लाख, वर्ष 2016 मध्ये 12.66 लाख तर, वर्ष 2017 मध्ये 1.89 लाख अशी रक्कम अदा करण्यात आली आहे. तर डॉ सुहास पेडणेकर यांनी सर्व विक्रम मोडले आहेत. वर्ष 2018 मध्ये 3.39 लाख, वर्ष 2019 मध्ये 2.22 लाख, वर्ष 2020 मध्ये 5.55 लाख आणि वर्ष 2021 मध्ये 1.89 लाख रुपयांची वीज वापरली आहे. डॉ सुहास पेडणेकर यांनी फक्त 4 वर्षात 13 लाखांची वीज वापरली आहे तर डॉ वेळूकर आणि डॉ. देशमुख यांनी 7 वर्षात 12 लाखांची वीज वापरली आहे.

( हेही वाचा : कोणत्या ५४ चिनी अ‍ॅप्सवर भारत सरकारने घातली बंदी? जाणून घ्या.. )

अनिल गलगली यांच्या मते निवासस्थान आणि सुविधा जरी दिल्या असल्या तरी वीज जपून वापरली जाणे अपेक्षित आहे. पगाराच्या तुलनेत सुविधांवर खर्च अधिक होत असून यावर बंधन नसले असले तरी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून अशा सुविधांचा वापर काटकसरीने करणे योग्य राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.