‘DRDO’ ने तयार केले मानवरहित विमान

109

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (DRDO) अत्याधुनिक मानवरहित विमान विकसित करण्यात एक मोठे यश मिळाले आहे.‘डीआरडीओ’ ने ‘ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नोलॉजी डिमॉन्स्ट्रेटर’चे पहिले उड्डाण यशस्वीरित्या केले आहे. वैमानिकाशिवाय उड्डाण केलेल्या या विमानाने उड्डाण करण्यापासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे स्वतः केली. कर्नाटकातील चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये शुक्रवारी हे परीक्षण करण्यात आले.

मानवरहित विमान

यासंदर्भातील निवेदनात ‘डीआरडीओ’ने सांगितले की, या वैमिनिकरहीत विमानाचे उड्डाण खूप चांगले झाले. हे उड्डाण पूर्णपणे स्वयंचलित होते. यामध्ये टेक-ऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन आणि स्मूथ टचडाउनची चाचणी घेण्यात आली. हे उड्डाण भविष्यात मानवरहित विमानाच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘डीआरडीओ’ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या युएव्हीचे डिझाईन ‘डीआरडीओ’ अंतर्गत बंगळुरू येथील प्रमुख संशोधन प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (एडीई) तयार केले आहे. त्याचा विकासही एडीईने केला आहे. हे एक छोटे मानवरहित विमान आहे. यात टर्बोफॅन इंजिन आहे.

संरक्षण मंत्र्यांनी केले अभिनंदन

एअरफ्रेम आणि विमानाची संपूर्ण रचना, चाके, उड्डाण नियंत्रण तंत्रज्ञान आणि एव्हीओनिक्स प्रणालीदेखील पूर्णपणे स्वदेशी असल्याचे सांगितले. डीआरडीओच्या या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटर संदेशात राजनाथ सिंह म्हणाले की, चित्रदुर्ग एटीआरच्या वतीने ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन… ऑटोनॉमस विमाने तयार करण्याच्या दिशेने ही मोठी उपलब्धी असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.