३५ वर्षांपासून ती त्याच्यापासून वेगळी झाली नाही आणि त्याने तिची साथ सोडली नव्हती. एवढ्या वर्षांमध्ये तिने कधीच धोका दिला नाही. अपघातापासून देखील ती दूरच होती. अखेर ३५ वर्षानंतर दोघे वेगळे झाले. मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेली शेवटची ‘अम्बेसेडर’ कार आणि तिचा चालक मुटू पंडी अँडी नाडर मंगळवारी दोघेही सेवानिवृत्त झाले. मुटू पंडी अँडी नाडर याने तिच्यासोबतच्या ३५ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. मागील ३५ वर्षात तिने कधीही धोका दिला नाही, ती कधीच रस्त्यात बंद पडली नाही, तिचा कधी अपघातही झाला नाही. मात्र ३५ वर्षांनी तिची साथ सुटताना खूप वाईट वाटत असल्याचे सांगत असताना चालक नाडर यांच्या डोळ्यात पाणी आले.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील शेवटची कार निवृत्त
भारतीय कार कंपन्यांनी कारचे नवीन मॉडेल लाँच करण्यास सुरुवात केली. तेव्हा सरकारी कार्यालये आणि मंत्री बंगल्यांमधून अम्बेसेडर (राजदूत) कार गायब होऊ लागल्या. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील शेवटची अम्बेसेडर कार देखील ३५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाली. तिच्या सोबत तिचा चालक देखील मंगळवारी सेवानिवृत्त झाला, या दोघांना मंगळवारी निरोप देण्यात आला. रंगीबेरंगी फुगे आणि फुलांनी सजवलेली अम्बेसेडरला निरोप देण्यासाठी आलेल्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिला लाल दोरीने ओढत गेटपर्यंत आणून निरोप दिला.
३५ वर्षात १६ व्यवस्थापकांनी गाडीची घेतली सेवा
मध्य रेल्वेने जानेवारी १९८५ मध्ये आपल्या व्यावसायिक व्यवस्थापकासाठी अम्बेसेडर कार (MFA-7651 22) खरेदी केली. त्यासाठी चालक मुटू पंडी अँडी नाडर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुमारे ३५ वर्षांच्या सेवेनंतर, अम्बेसेडर कार आणि तिचा चालक दोघेही निवृत्त झाले. तिच्या ३५ वर्षाच्या सेवेदरम्यान मध्य रेल्वेच्या १६ व्यावसायिक व्यवस्थापकांनी या गाडीची सेवा घेतली. मुटू पांडी अँडी नाडर गेल्या ३५ वर्षांपासून ही कार चालवत आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, मंगळवार हा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अम्बेसेडर कारचा शेवटचा दिवस होता.
(हेही वाचा – भाजपचे आयुक्तांना पत्र: पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कामकाजाची अपेक्षा)
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आनंदाश्रूंनी निरोप
रेल्वे अधिकाऱ्यांनी आनंदाश्रूंनी निरोप घेतला, मुटू पांडी अँडी नाडर, ज्याने ३५ वर्षे ही कार चालवली आहे, ते देखील कार सोबतच निवृत्त होत आहेत. सोमवारी या गाडीची सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. बुधवारी ही अम्बेसेडर कार मध्य रेल्वेच्या रोड डेपोमध्ये भंगारासाठी पाठवण्यात येणार आहे. ड्रायव्हर मुटू पांडी अँडी नाडर यांच्या आठवणीही या कारशी जोडल्या गेल्या आहेत. अँडी नाडर यांनी सांगितले की, गेल्या ३५ वर्षांत या कारचा एकही अपघात झालेला नाही आणि ती कधीच मध्ये बंद पडली नाही. मध्य रेल्वेचे वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक गौरव झा यांनी मंगळवारी या अम्बेसेडर कारमधून शेवटचा प्रवास केला.
Join Our WhatsApp Community