तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल किंवा जे आहे ते रिन्यू करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण नुकतेच केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केल्याचे सांगितले जात आहे. या नव्या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – ‘लालपरी’ नव्या रंगात! ‘या’ मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक बस )
1 जुलै 2022 पासून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नवीन नियम लागू केले जाणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या सुधारित नियमानुसार, आता तुम्हाला RTO ला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देणं बंधनकारक नसणार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणाऱ्या चालकांना दिलासा मिळणार आहे.
असे मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स…
- आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करता येणार. त्यानंतर तिथून परीक्षा दिल्यानंतर त्यात उत्तीर्ण व्हावे लागेल. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यात येईल.
- ड्रायव्हिंग लायसन्स शिकवण्याचा अभ्यासक्रम मंत्रालयाने तयार केला आहे. हे सिद्धांत आणि व्यावहारिक अशा दोन भागात विभागलेले आहे. लाइट मोटर व्हेईकल या अभ्यासक्रमाचा कालावधी चार आठवडे असेल असे सांगितले जात आहे.
- तर प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींवर प्रॅक्टिकलसाठी 21 तास द्यावे लागतील. उर्वरित 8 तास तुम्हाला थिअरी शिकवली जाईल.