“दानिश चिकना… नाम तो सुना ही होगा”. दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा सहकारी युसूफ चिकना याचा मुलगा म्हणजे दानिश मर्चंट ऊर्फ दानिश चिकना. हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. याच दानिश चिकनाला एनसीबीने काही दिवसांपूर्वीच राजस्थान मधून अटक केली. राजस्थानच्या कोटा येथून पोलिसांच्या मदतीने १२०० किलोमीटर पाठलाग केल्यानंतर दानिश हा एनसीबीच्या जाळ्यात अडकला.
एनसीबीने केली होती ड्रग्सची प्रयोगशाळा उध्वस्त
एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने ड्रग्स पेडलर चिंकू पठाण याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक केली होती. त्याच्या चौकशीत आरिफ भुजवाला याचे नाव समोर आले होते. दरम्यान एनसीबीकडून डोंगरीत छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत आरिफ भुजवाला याचा ड्रग्सचा कारखाना आणि ड्रग्सची प्रयोगशाळा उध्वस्त करण्यात आली होती. या छापेमारीत मात्र आरिफ भुजवाला एनसीबीच्या हातून निसटला होता.
(हेही वाचाः वाझे कारनाम्यात बाईनंतर आता बाईकची एन्ट्री!)
भाजीपाल्याच्या ट्रकमधून ड्रग्सचा व्यवसाय
मुंबई पोलिसांच्या नाकासमोर आरिफ भुजवाला डोंगरीत ड्रग्सचा कारखाना चालवत होता. एनसीबीने या कारखान्यावर कारवाई करुन कोट्यावधींचे ड्रग्स, रोकड, जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर दानिश चिकना हे नाव समोर आले. दानिश हा ड्रग्सच्या धंद्यात आला तो डोंगरीतील छोट्याखानी घरामधून. त्याने भाजीपाल्याच्या टेम्पोमधून ड्रग्सचा व्यापार सुरू केला. आरिफ भुजवाला प्रमाणे त्याने डोंगरीत ड्रग्सच्या प्रयोगशाळा आणि कारखाने सुरू केले होते. अशी माहिती एनसीबीच्या हाती लागली होती.
फुटपाथवर राहणा-या मुलांकडून ड्रग्सचा सप्लाय
एनसीबीचे पथक दानिशच्या मागावर असताना राजस्थानच्या कोटा शहरातून त्याला गेल्या आठवड्यात बेड्या ठोकण्यात आल्या. दानिश याच्यावर डोंगरी पोलिस ठाण्यात खंडणी, मारामारी, खुनाचा प्रयत्न या सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एमडीचा मोठा सप्लायर म्हणून दानिशचे नाव समोर आले असून, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना ड्रग्सचे व्यसन लावून दानिश मुलांच्या माध्यमातून ड्रग्स सप्लाय करत असल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community