सुशांतसिंग राजपूत प्रकरणानंतर एनसीबीने ड्रग्स विरोधी कारवाई सुरू केली होती. तेव्हा अटकेच्या भीतीने भूमिगत झालेली नायजेरियन टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या टोळीने मुंबई तसेच परिसरातील शहरात पुन्हा एकदा ड्रग्स विक्री मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मानखुर्द येथे नुकतीच कारवाई करून दोन नायजेरीयन नागरिकांना एमडी या ड्रग्सच्या साठ्यासह अटक केली आहे.
नायजेरियन टोळ्या पुन्हा सक्रिय
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या चौकशीत ड्रग्सचा समावेश असल्याचे समोर येताच केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मुंबईत छापेमारी सुरू केल्यानंतर ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले होते. अनेक ड्रग्स माफिया एनसीबीच्या कारवाईनंतर भूमिगत झाले होते, तर मुंबईत ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन टोळ्यांनी देखील मुंबईतून काढता पाय घेतला होता.
( हेही वाचा : शेतकऱ्यांचे सरकार आहे, हे कृतीतून सिद्ध करा- अजित पवारांचा हल्लाबोल)
एनसीबीच्या कारवाया थंडावताच मुंबईत पुन्हा एकदा ड्रग्स माफियांनी तसेच नायजेरियन टोळ्यांनी आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्स माफियावर आपले लक्ष केंद्रित करून बुधवारी मानखुर्द येथील मुंबई पनवेल महामार्ग येथून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या दोघींजवळून पोलिसांनी १ किलो पेक्षा जास्त वजनाचे मफेड्रोन (एमडी) या ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत २ कोटी ८० लाख रुपये असून जप्त करण्यात आलेला एमडी हा उच्च दर्जाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेले दोघे नायजेरियन सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नालासोपारा येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून हे दोघे ड्रग्स तस्करीच्या धंद्यात असून मोठे सप्लायर असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community