- ऋजुता लुकतुके
चंद्रयान मोहिमेचं यश हे फक्त अंतराळ विज्ञानातील यश नसून त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. कशी ते बघूया. भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्त्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या यान उतरवून दाखवलं. आणि त्यामुळे चंद्रावर स्वारी केलेल्या पाच देशांमध्ये भारताची गणना होऊ लागली आहे. अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने ही घटना जशी महत्त्वाची आहे तसंच या घटनेला आर्थिक दृष्टीनेही महत्त्व आहे. कारण, अंतराळ आणि संरक्षण ही येणाऱ्या काळातील महत्त्वाची आर्थिक प्रगतीची क्षेत्र आहेत. आणि तिथे भारत घट्ट पाय रोवून उभा आहे. पाच मुद्यांमध्ये बघूया भारताचं हे यश.
१. चार दिवसांत भारतीय कंपन्यांची ३१,००० कोटींची कमाई
इस्त्रो संस्था मागची तीन वर्षं चांद्रयान मोहिमेची तयारी करत होती. आणि त्यात काही खाजगी कंपन्याही इस्त्रोला सहाय्य करत होत्या. इस्त्रोची ही चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर या कंपन्यांमध्ये देशांतर्गत तसंच परकीय गुंतवणूक वाढली आहे. आणि या कंपन्यांचे शेअर १० ते २० टक्क्यांनी वर गेले आहेत. त्यामुळे चंद्रयान मोहिमेच्या चार दिवसांत १३ भारतीय कंपन्यांचं भांडवली मूल्य तब्बल ३०,७०० कोटी रुपयांनी वाढलं.
यात आघाडीवर आहे सेंटम इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी. ही कंपनी इस्त्रोला क्रिटिकल मॉड्यूल पुरवते. कंपनीच्या शेअरमध्ये चार दिवसांत २६ टक्के इतकी वाढ झाली. तर एव्हान्टेल, लिंड इंडिया, पारस डिफेन्स आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल या कंपन्यांमध्येही तेजी दिसून आली. गोदरेज कंपनीच्या शेअरमध्येही ८ टक्के वाढ झाली आहे. फक्त इलेक्ट्रिकल कंपन्याच नाही तर मिश्र धातू आणि प्लास्टिक कंपन्यांनीही इस्त्रोला कच्चा माल पुरवला होता.
२. अंतराळ क्षेत्रात भारताला मोठी संधी
अंतराळ क्षेत्र हे जगातील एक उगवतं आर्थिक क्षेत्र आहे. अंतराळ मोहिमांच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवणं हा एक भाग आहेच. पण, त्याशिवाय आता मानवाला अंतराळात पर्यटन किंवा भ्रमण करण्याचं स्वप्न पडू लागलं आहे. एलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी भविष्यात तीच तयारी करत आहे. सध्या सॅटलाईट किंवा उपग्रह प्रक्षेपणात क्षेत्रात भारत पाय रोवून उभा आहे. आणि इतर देशांना उपग्रह प्रक्षेपणात मदत करण्यासाठी भारताने अंतरिक्ष ही कंपनीही स्थापन केली आहे. चंद्रयानच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताबरोबर अंतराळ क्षेत्रात भागिदारीसाठी चार देश पुढे सरसावले आहेत. सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या देशांनी भारतासमोर तसे प्रस्ताव ठेवल्याचं समजतं. केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.
‘भारताच्या चंद्रयान मोहिमेमुळे जगाच्या नकाशावर अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताचं नाव होईल. आणि संशोधन क्षेत्रातील भारताचं योगदान इथून पुढे वाढेल,’ असं पियुष गोयल यांनी बोलून दाखवलं. अंतरिक्ष या भारतीय कंपनीकडेही अनेक प्रस्ताव येत आहेत. सध्या अंतराळ क्षेत्र हे आर्थिक दृष्ट्या ४४७ अब्ज अमेरिकन डॉलरचं क्षेत्र आहे. पण, यात भारताचा वाटा अत्यल्प म्हणजे २-३ टक्के आहे. पण, येणाऱ्या ८-१० वर्षांमध्ये तो नक्की वाढू शकतो.
३. भारतासाठी अंतराळ क्षेत्र खुलं झालं
भारताला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल त्याचबरोबर देशातील अंतराळ कंपन्यांनाही चालना मिळेल. या घडीला देशात १४० च्या वर नोंदणीकृत स्टार्ट-अप आहेत, ज्यांना अंतराळ क्षेत्रात काम करायचं आहे. अंतराळ तंत्रज्ञान, एअरोस्पेस आणि संशोधन व विकास या क्षेत्रातील या कंपन्यांमध्ये येणाऱ्या दिवसांत चांगली गुंतवणूक होऊ शकते. केंद्रसरकारही आता अंतराळ क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवेल. त्याबरोबर परकीय गुंतवणूकदारांचा ओढाही वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय स्टार्टअपसाठी येणारे दिवस हे चांगले असतील.
डेलॉईट इंडियाचे श्रीराम अनंतसायनम याविषयी बोलताना म्हणाले, ‘चंद्रयान मोहीम ही आपल्या आयुष्यात एकदाच पहायला मिळणारी, इतकी महत्त्वाची घटना आहे. हे यश भारताने मिळवलं आहे म्हटल्यावर तरुणांना वैज्ञानिक आणि शास्त्रीय संशोधनात रस निर्माण होईल, त्यासाठी देशात पोषक वातावरण असेल. आणि या सगळ्याचा परिपाक भारत देश अंतराळ क्षेत्रात पुढे जाण्यात होईल. एकतर अंतराळ क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण होऊ. आणि जागतिक गुंतवणूकदारांनाही आकर्षिक करू.’
४. ‘मेक इन इंडिया’ला चालना
चंद्रयान मोहीम ही फक्त गौरवाचा क्षण नाहीए. तर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला मेक इन इंडियाचा नारा बुलंद करणारी घडामोड आहे. कारण, इस्त्रो संस्थेनं पूर्णपणे भारतात हे मॉडेल विकसित केलं. आणि आता मोहिमेला मिळालेल्या यशामुळे अंतराळ संशोधन, तंत्रज्ञान या क्षेत्रात भारतीय कंपन्यांना चांगली संधी निर्माण झाली आहे. फक्त अंतराळच नाही, तर दूरसंचार, दळणवळण, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, उपग्रह प्रणाली अशा सर्वच क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळू शकेल.
५. शेअर बाजारांना काय फायदा होईल?
अंतराळ क्षेत्रात भारताचा वाटा हळू हळू वाढणार आहे. आणि त्याचा महत्त्वाचा आणि दीर्घकालीन फायदा भारतीय शेअर बाजारांना होणार आहे. परकीय गुंतवणूकदारांचा ओढा पुन्हा एकदा भारतीय बाजारांकडे वाढेल. आणि हा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल. शिवाय अंतराळ क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्यांमध्ये येणाऱ्या दिवसांत मोठी गुंतवणूक दिसून येईल. किंबहुना तो ओघ आताच दिसून येत आहे. दूरसंचार, दळणवळण, अंतराळ विकास तसंच संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढू शकेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community