कोविड १९ लॉकडाऊन नंतर मुंबईतील सर्व कामकाज १०० टक्के सुरू आहे. कोविडच्या रुग्णांत घट होत आहे. हा आजार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात येत असताना, सोशल डिस्टनसिंगच्या नावाखाली महापौर ऐतिहासिक सभागृहाऐवजी राणीबागेतील अण्णा भाऊ साठे बंदिस्त नाट्यगृहाच्या जागेवर महापालिकेच्या सभा घेण्याच्या प्रयत्नात आहे. एकाबाजूला खचाखच भरलेल्या रेल्वे लोकल आणि बेस्ट बस तसेच गर्दीने फुलून गेलेली रेल्वे स्थानके, सार्वजनिक जागा, तसेच आंदोलन, मोर्चा काढले जात असताना महापालिकेच्या सभा सोशल डिस्टनसिंगच्या नावाखाली ऐतिहासिक सभागृहात घेण्यास टाळाटाळ होत आहे. गर्दीतून प्रवास करणाऱ्यांना कोविड होत नाही, पण सभागृहात बसल्याने नगरसेवकांना कोविड होऊ शकतो, अशी भीती प्रशासनाला वाटते की काय असा सवाल केला जात आहे.
महापालिकेच्या सभा अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात
मुंबई महापालिकेच्या प्रत्यक्ष महापालिका सभांना मागील सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. पण या सभेमध्ये केवळ १७० नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. परंतु सर्व नगरसेवकांची उपस्थिती ग्राह्य धरल्यास सभागृहातील आसनक्षमता सोशल डिस्टन्सिंगचा विचार केल्यास अपुरी पडू शकते. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या सभा राणीबागेतील अण्णाभाऊ साठे बंदिस्त सभागृहात घेण्याचा विचार महापालिकेचा आहे. महापौरांनी, महापालिकेच्या सभा अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या जागेत घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोविडच्या आजाराचा प्रार्दुभाव झाल्यानंतर मार्च २०२०पासून शासनाच्या निर्देशानुसार, महापालिका सभागृह तसेच विविध समित्यांच्या सभा बंद होत्या, पण त्यानंतर ऑक्टोबर २०२०पासून व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या सभाही व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे घेण्यात येवू लागल्या. पण तेव्हापासून २२ नोव्हेंबरपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारेच सभा होत होत्या. पण २२ नोव्हेंबरला महापालिकेची पहिली प्रत्यक्ष सभा झाली. परंतु सोशल डिस्टन्सिंगचा विचार करता ऐतिहासिक सभागृहामध्ये या सभा घेता येणार नसल्याने पर्याय म्हणून भायखळा राणीबागेतील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या जागेत महापालिका सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे सभागृहातच सभा व्हाव्यात
मुंबईत कोविडचा आजार नियंत्रणात येत असताना तसेच मास्क लावून सभेत सहभागी होत असताना सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही. परंतु प्रशासन सोशल डिस्टन्सिंगच्या अटीवर ठाम असल्याने महापालिका सभा अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या जागेची निवड महापौरांनी केली आहे. परंतु यापूर्वी नाट्यगृहाच्या जागेचा पर्याय हा यापूर्वी स्वीकारता आला असता. पण आता सर्वच ठिकाणी गर्दी होत असताना, तसेच प्रत्येक नगरसेवकांचे दोन डोस पूर्ण झालेले असल्याने काळजी घेत ऐतिहासिक सभागृहात प्रत्यक्ष सभा घेता येवू शकतात,असे काहींचे म्हणणे आहे. प्रशासनाने हा पर्याय आधी स्वीकारला असता तर त्याचे समर्थन करता आले असते, पण आता ऐतिहासिक सभागृहात या सभा घेता येऊ शकतात,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच राणीबागेतील या नाट्यगृहाच्या सभागृहात सभा घेतल्यास सभेचे कामकाज करणाऱ्या संबंधित विभागांचे अधिकारी,कर्मचाऱ्यांसह कागदपत्रांचीही हलवाहलवी करावी लागणार आहे. जे महापालिकेच्या दृष्टीकोनातून योग्य नाही. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहातच मास्क व सॅनिटायझरचा वापर करत सभा घेतल्या जाव्यात असेही बोलले जात आहे.
(हेही वाचा :‘सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी’ )
Join Our WhatsApp Community