भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईतल्या बच्चेकंपनीसह पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राणीच्या बागेतील नागरिकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार आणि रविवारी तर राणीच्या बागेत गर्दीचा महापूर येत आहे. शनिवारी राणीच्या बागेला तब्बल १७, ६१७ लोकांनी भेट दिली आहे. याद्वारे राणीच्या बागेला ६ लाख ५४ हजार १७५ रुपये एवढा महसूल मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – आता RTO च्या फेर्या मारणे होणार बंद! कारण…)
कोरोना महामारीमुळे राणीची बाग बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा कमी झालेला कहर, पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांची पावले राणीच्या बागेकडे वळू लागली आहेत. राणीची बाग ४८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या उद्यान व प्राणिसंग्रहालयात अनेक वृक्ष, झाडी, प्राणी, पक्षी इत्यादी आहेत. १९ नोव्हेंबर १८६२ रोजी उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी या घटनेला, उद्यान व प्राणिसंग्रहालयाला १६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा करण्यात येत आहे.
काय आहे राणीच्या बागेत?
- नवीन पक्ष्यांच्या नंदनवनात वॉक थ्रू सुविधेसह तयार केलेली प्रदर्शनी आहे.
- काचेच्या प्रदर्शन गॅलरीमधून आतील तयार करण्यात आलेले नैसर्गिक अधिवास, पक्ष्यांकरिता विविध झाडे-झुडपे, घरटी तयार करण्याच्या जागा, खेळणी, पाणी पिण्याच्या सुविधा इत्यादी पाहता येतात.
- युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित स्टेनलेस स्टील वायरमेशची संरचना प्रदर्शनीच्या आच्छादनासाठी उभारण्यात आली आहे.
- या प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटिल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदी पाणपक्षी प्रदर्शित करण्यात आले.