मुंबईला ड्रग्जमुक्त करणे का आहे आव्हानात्मक?

143
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईला ड्रग्जमुक्त करू असे मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले असले तरी ते शक्य होणार नसल्याचे दिसते आहे. मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबईतील ड्रग्ज विक्रेते, तस्कर यांना रोखणे अमलीपदार्थ विरोधी पथकासमोर आव्हान असल्याचे या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

मुंबईत ड्रग्जचा मोठा व्यवहार

मुंबई शहरात विविध प्रकारचे अमली पदार्थाचे सेवन आणि बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदी कॉलेज तरुणांपासून ते चित्रपटसृष्टीत ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे मागच्या वर्षभरात समोर आले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी)ने मुंबईत सुरू केलेल्या कारवाईत ड्रग्जचे मोठे सिंडिकेट समोर आले आहे. अगदी झोपडपट्ट्यांपासून ते उच्च सोसायटीमध्ये कशा प्रकारे ड्रग्जचा प्रसार झाला आहे. हे एनसीबीच्या कारवाईत समोर आले आहे.

मुंबई ड्रग्जमुक्त होणार?

एनसीबीच्या कारवाई पाठोपाठ मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेली अनेक वर्ष मुंबईत बेकायदेशीर विकल्या जाणाऱ्या अमली पदार्थावर नियंत्रण आणले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत तसेच मुंबई बाहेर जाऊन देखील कारवाया करत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करून ड्रग्ज माफियांना अटक केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी मुंबईला ड्रग्जमुक्त करू असे म्हटले आहे, तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाला मुंबईतून ड्रग्जची तस्करी पूर्णपणे रोखा असा आदेश दिला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे मुंबईसारख्या शहराला ड्रग्जपासून मुक्ती कशी मिळवता येईल असा प्रश्न अमली पदार्थ विरोधी पथकाला पडला आहे.
मुंबईत ९८ पोलीस स्टेशन्स आहेत, तर गुन्हे शाखेच्या १२ अधिक इतर शाखा आहेत. मात्र अमली पदार्थ विरोधी पथकाचे संपूर्ण मुंबईत केवळ ५ युनिट आहेत. या ५ युनिटला पोलीस उपायुक्त दर्जाचा एक अधिका-यासह केवळ १३० जणांचे मनुष्यबळ आहे. १३० जणांचे हे पथक संपूर्ण मुंबई ड्रग्जमुक्त कशी करू शकतील असा प्रश्न अमली पदार्थ विरोधी पथकाला पडला आहे. ड्रग्जची एक कारवाई पूर्ण करताना आठवडा उलटतो, गुन्ह्याची कागदपत्रे तयार करण्यापासून आरोपीला न्यायालयात हजर करण्यापर्यंंत वेळ जातो. आरोपी जोपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे, तोपर्यंत त्याच्याकडे चौकशी करणे, त्याची प्रत्येक २४ तासांनी वैद्यकीय तपासणी करणे, तपासासाठी बाहेर घेऊन जाणे हे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी दोन आठवडे सहज निघून जातात. मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे इतर कारवाई करता येत नाही, अशी खंत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या काही अधिक-यांनी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.