मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याचे पोलिसांपुढे आव्हान

78

मुंबईत नुकताच गणेशोत्सव शांततेत पार पडला असला तरी शिवसेनेच्या दोन गटाचे दसरा मेळावे, देवीच्या विसर्जन मिरवणुका त्याचबरोबर शहरातील कायदा व सुव्यव्यस्था सांभाळणे या सर्व जबाबदाऱ्या कशा पार पडणार अशी चिंता मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आहे. मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ संख्या साडेनऊ हजाराने कमी असून या अपुऱ्या मनुष्यबळात या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

( हेही वाचा : समुद्रात दिसलेल्या जलपर्णीचे रहस्य काय? तज्ज्ञांनी सांगितले…)

मुंबई पोलिसांसमोर दसरा मेळाव्याचे सावट

राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अंमलदारांच्या विनंतीवरून त्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यामध्ये केल्यानंतर मुंबई पोलीस दलात पोलिसांचे संख्याबळ कमी झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई पोलीस दलात नवीन भरती न झाल्यामुळे मुंबई पोलीस दलातील संख्याबळ कमी झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलीस दलात साडे नऊ हजार पोलीस संख्याबळ कमी आहे. त्यात राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाची पहिली ठिणगी ही मुंबईत पडते, त्याचबरोबर राज्यातील मोठे उत्सव मुंबईत पार पडतात, राजकीय सभा, मुंबईत येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तीची सुरक्षा, बंदोबस्त तसेच शहराची कायदा सुव्यस्था संभाळण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. मुंबईत नुकताच गणेशोत्सव शांततेत पार पडला असला तरी मुंबई पोलिसांसमोर दसरा मेळाव्याचे सावट आहे.

यंदा मुंबईत शिवसेनेच्या दोन गटाचा दसरा मेळावा मुंबईत पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वांद्रे येथील बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेत असून ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क दादर या ठिकाणी होणार आहे. सूत्रांच्या म्हण्यानुसार या दोन्ही मेळाव्याच्या वेळा एकच असून दोन्ही गट यावेळी शक्ती प्रदर्शन करणार असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गट आणि आणि गटाचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. त्याच दिवशी देवींची विसर्जन मिरवणूक देखील असणार आहे. मुंबई बाहेरून येणारे दोन्ही गटाचे कार्यकर्ते ज्या वाहनातून येणार आहे, त्या वाहनांमुळे मुंबई वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान हे दोन्ही गट एकमेकांसमोर येणार नाहीत किंवा समोर समोर आल्यानंतर त्यांच्यात कुठलाही वाद होऊ नये म्हणून पोलिसांना काळजी घ्यावी लागणार आहे. दसरा मेळाव्याच्या दोन्ही ठिकाणी पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागणार असून शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळावी लागणार आहे. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आव्हान मुंबई पोलीस दलावर असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.