लॉकडाऊनमुळे स्कूल बस व्यवसायिक तोट्यात! ७ सात जणांची आत्महत्या!

संपूर्ण राज्यात ४० हजार शालेय बस आणि ७० हजार शालेय व्हॅन आहेत. मात्र सध्या या सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड पडली आहे. त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.

83

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून, आधीच कंबरडे मोडलेले स्कूल बस चालक आणखी अडचणीत सापडले असून, आता जगायचे तरी कसे, असा प्रश्न या स्कूल बस चालक-मालकांना पडला आहे. गेल्यावर्षी लागलेल्या लॉकडाऊनपासून राज्यातील शाळा बंद आहेत. मात्र यावर्षी तरी कोरोनाचे संकट दूर होईल, अशी अपेक्षा स्कूल बसवर उदरनिर्वाह असलेल्या सर्वांची होती, मात्र यंदाही कोरोनाचे संकट कायम असल्याने आता उपसमारीची वेळ आली आहे.

आता जगायचे कसे हा प्रश्न?

वर्षभरापासून शाळा बंद असून, ऑनलाइन क्लासेस फक्त सुरू होते. त्यामुळे शालेय बस नुसत्याच उभ्या आहेत. या बसचे मालक, चालक, क्लीनर, महिला सहाय्यक असे सर्वच यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढत्या किमती, वाहनकर्जाचा हप्ता, डिझेलमधील दरवाढ, चालक, मदतीनस, महिला सहाय्यक यांचा पगार, विम्याच्या हप्त्याच्या रकमेत झालेली वाढ, गाडी पासिंगच्या शुल्कात झालेली वाढ आदीचा खर्च पाहता स्कूल बसचालकांचे कंबरडे मोडले असून, आता जगायचे तरी कसे असा प्रश्न या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांना पडला आहे. संपूर्ण राज्यात ४० हजार शालेय बस आणि ७० हजार शालेय व्हॅन आहेत. मात्र सध्या या सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड पडली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आल्याने राज्यात सात जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.

सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मदतीसाठी विनंती केली होती, मात्र केवळ आश्वासने मिळाली. आमचे जे ईएसआयसीचे पैसे पडून आहेत तेच मागितले आहेत, मात्र तेही दिले जात नाहीत. सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. एकीकडे केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत योजना राबवीत आहे, पण आता शालेय बस मालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
– रमेश मनियर, शालेय विद्यार्थी वाहतूक बस चालक

या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांनी ‘हा’ निवडला पर्याय!

कोरोनामुळे बसचालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे बसचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत. काही बसमालक गाड्या धुणे, भाजीपाला विकणे, एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणे आदी कामे करत आहेत. तसेच बेस्ट, एसटी संप झाल्यावर स्कूल बसला अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्यात येते. मग आता प्रवासी वाहतुकीला परवानगी का नाही, असा प्रश्न शालेय संघटनांनी उपस्थित केला आहे. लॉकडाउनमध्ये सवलती मिळाल्यानंतर अनेकांच्या कमाईचा मार्ग मोकळा झाला. मात्र स्कूल बसला प्रवासी वाहतूक करण्याची परवनागी नसल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न कायम आहे, असे शालेय बस संघटनेने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा : शेलारांनी घेतला शिवसेनेचा समाचार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.