कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बुधवारपासून 12 वर्षे पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-१९ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. हे जरी दिलासादायक असले तरी मुंबईत 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा पहिला दिवसच गोंधळाचा ठरल्याचे समोर आले आहे. CoWIN अॅपमध्ये नोंदणीच झाली नसल्याने बहुतांश लसीकरण केंद्रात किशोरवयीन मुलांचे लसीकरण झालेच नाही. CoWIN अॅप अपडेट न झाल्यामुळे मुंबईतील अनेक रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन झाले नाही, परिणामी पहिला दिवस केवळ तांत्रिक अडचणींचा सामना कारण्यातच गेला. यामुळे लाभार्थी मुलांसह पालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.
12 वाजेपासून लसीकरण सुरु होणार होते पण…
पहिल्या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार होती . मात्र प्रत्यक्षात दुपारी 2 वाजता लसीकरणाचा श्री गणेशा झाला. मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालायात केवळ 3/4 लाभार्थी लसीकरणासाठी आले. मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात केवळ दोन लाभार्थीचे लसीकरण झाले. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातही 15 ते 20 जणांना लसीकरण केले गेले. याऊलट जंबो नेस्कोमध्ये 12 ते 14 वयोगटातील मुलांनी हिरीरीने लसीकरणास सहभाग नोंदवला. प्रत्यक्षात अपेक्षित वेळेपेक्षाही लसीकरणास दोन तासाने विलंब झाला असला तरीही पालकांची आपल्या मुलाने लसीकरण करवून घ्यावे ही तळमळ दिसून आली.
लाभार्थीने दिली अशी प्रतिक्रिया
मला औषधे आवडत नाही, पण इंजेक्शनची भीती वाटत नाही. लसीकरण झाल्याने मी आता कुठेही फिरू शकते याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया नेस्को केंद्रात लसीकरणाची पहिली लाभार्थी नवलीन कौर हिने दिली.
Join Our WhatsApp Community