राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आली असून, या अटकेमुळे जे. जे. रुग्णालयातील बदली कर्मचाऱ्यांच्या सेवानियमित होण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
( हेही वाचा : बेस्टच्या सामायिक कार्डकडे प्रवाशांनी फिरवली पाठ )
सेवा नियमित करण्याचे आदेश
सर ज. जी. समुह रुग्णालयासह संपूर्ण महाराष्ट्रातील ६५० बदली कर्मचारी मागील २० ते २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. मॅटच्या आदेशानंतर त्यातील २४८ बदली कर्मचाऱ्यांची सेवा शासनाने ०७.१२.२०१५ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ०७.१२.२०१५ पासून नियमित केल्यानंतर उर्वरीत बदली कर्मचाऱ्यांची ‘ब’ यादी तयार करण्यात आली. या ‘ब’ यादीतील कर्मचाऱ्यांनी शासनाकडे/वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांकडे त्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांना न्याय न मिळाल्यामुळे सर, ज जी समुह रुग्णालयातील १२२ बदली कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई (मॅट) येथे अर्ज क्रमांक ७५६/२०२० (मायावती सावंत व इतर १०९ बदली कर्मचारी) दाखल केला. या अर्जात न्यायाधिकरणाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी अंतिम निकाल देऊन या बदली कर्मचा-यांना दिनांक २० जानेवारी २००३ पासून नियमित करण्याचे आदेश दिले.
आणखी पैसे आणायचे कुठून?
१२२ बदली कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतले आहे. त्यांनी या बदली कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. यासाठी त्यांनी प्रत्येक कर्मचा-याकडून १ लाख ५० हजार रुपये घेतले आहेत, अशी माहिती यातील कर्मचाऱ्यांकडूनच दिली जात आहे. तसेच अ यादीतील ७ डिसेंबर २०१५ पासून नियमित करण्यात आलेल्या २४८ बदली कर्मचा-यांकडूनसुद्धा सदावर्ते यांनी प्रत्येकी एक लाख रूपये घेतले असल्याचे सांगितले जात आहे. या कर्मचाऱ्यांची बाजू उच्च न्यायालयात मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र आता मॅटच्या निर्णयाला महाराष्ट्र शासन आव्हान देण्याच्या तयारीत असताना या कर्मचाऱ्यांचे वकील असलेले सदावर्ते यांना अटक झाल्याने आता आमची बाजू मांडणार कोण? दुसऱ्या वकीलला पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न या कर्मचा-यांना पडला आहे.
बदली कर्मचाऱ्यांना आता वाली कोण?
शासन मॅटच्या निकालाविरुद्ध आता उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत असून शासनाने याकरीता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून काही अवधी मागून घेतलेला आहे. परंतु अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काही दिवसांपूर्वीच अटक झाली असून, आता बदली कर्मचाऱ्यांना नवीन वकील शोधावा लागल्यास त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. महिना अखेरपर्यंत पगार हातात शिल्लक न उरणाऱ्या बदली कर्मचाऱ्यांनी दागिने गहाण ठेऊन, विकून तसेच व्याजाने पैसे घेवून हा व्यवहार केलेला आहे.
शासनाच्या अपील दाखल करण्याच्या धोरणामुळे बदली कर्मचारी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. कारण न्यायाधिकरणाच्या निर्णयावर शासनाचे आदेश होणे गरजेचे आहे. ही परिस्थितीत पहाता आता ‘ब’ यादीतील १२२ बदली कर्मचारी व ‘अ’ यादीतील २४८ बदली कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळणार? असा प्रश्न निर्माण होऊन बदली कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत.
Join Our WhatsApp Community