असा जातोय ‘लालपरी’चा पैसा खासगी चालक-वाहकांच्या खिशात!

158

एसटी महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनात करावे, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचारी वारंवार विनंती करूनही कामावर हजर होत नाही. दरम्यान सरकारने सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना हाक दिली आहे. वारंवार आवाहन करूनही संपकरी कर्मचारी कामावर परत येत नसल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूकीमध्ये वाढ होत आहे. खासगी पुरवठादाराच्या शिवनेरी व शिवशाही गाड्यांमार्फत वाहतूक सुरु असली तरी एक गंभीर बाब उघड झाली आहे.

संपाच्या काळात महामंडळाचं मोठं नुकसान

तसेच राज्यभरात आजही बहुतांश एसटी कर्मचारी संपावर असल्याने एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. एसटीचे कर्मचारी संपावर असल्याने लालपरीची वाहतूक अद्याप सुरळीत सुरू झालेली नाही, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसतेय. इतकेच नाही या संपाच्या काळात एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झाल्याचे देखील समोर आले आहे.

(हेही वाचा – #Hijabban: हिजाबबाबत कुराणात काय म्हटलंय? वाचा ‘या’ राज्यपालांचं मत)

एसटी महामंडळाला बसतोय फटका 

सध्या महामंडळाने खासगी पुरवठादारामार्फत चालकांची नियुक्ती करुन वाहतूक सुरु केली आहे. यापुढे खासगी पुरवठादारामार्फत वाहकांची देखील नियुक्ती करण्यात येणार आहे. परंतु असे निदर्शनास आले आहे की, खासगी बसेसवरील चालक व खासगी पुरवठादारामार्फत नियुक्ती केलेले चालक यांच्याकडून बेकायदेशीर प्रवासी घेवून त्यांच्याकडून पैसे वसूल करुन विनातिकीट प्रवास केला जात आहे. ही बाब गंभीर असून ‘लालपरी’चा पैसा खासगी चालक-वाहकांच्या खिशात जात असून त्याचा फटका एसटी महामंडळाला बसत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. परिणामी त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत असल्याचे सांगितले जात आहे.

ST

महामंडळाकडून प्रत्येक आगाराला सूचना

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून त्या-त्या विभागातील सर्व आगारांना मार्ग तपासणी पथके कार्यान्वित करुन त्यांचेमार्फत विभागातील सर्व बसेस व इतर विभागाच्या बसेसची तपासणी दैनंदिन करण्यात यावी, अशी सूचना कार्यालयाला देण्यात आली आहे. त्यामध्ये खासगी पुरवठादारामार्फत नियुक्त केलेले चालक / वाहक व खासगी शिवनेरी / शिवशाही बसेसचे खासगी चालक/ वाहक दोषी आढळल्यास सदर चालक / वाहक यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधीत पुरवठादाराकडून झालेल्या नुकसानाची वसूली करण्यात यावी. तसेच विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांवर महामंडळाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.