इंधनाच्या कमतरतेमुळे एसटी बसेसचा खोळंबा, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका

134

पुण्यात डिझेलची कमतरता निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचा मोठा खोळंबा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक एसटी बसेस पुण्यातील डेपोमध्येच उभ्या आहेत. डिझेल भरण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या या बसेस पुण्याच्या स्वारगेट डेपोमध्ये रांगेत उभ्या आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाच्या या भोंगळ कारभाराचा फटका मात्र एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.

(हेही वाचा – MSRTC: पुणेकरांना एसटी महामंडळाकडून दिवाळी भेट, काय आहे घोषणा…)

पुण्यातील शंकर शेठ रोडवर एसटी महामंडळाचे कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या डेपोत एसटी बसेस पार्किंग केल्या जातात. कार्यालयाच्या पुढच्या चौकात पौर्णिमा टॉवर शेजारी सरस्वती पेट्रोल पंप आहे. या पंपावर डिझेल भरण्यासाठी भर रस्त्यात या बसेस रांगेत उभ्या केल्या जातात. मात्र या पंपावर डिझेलचा तुटवडा असल्याने अनेक बस डेपोत उभ्या आहेत. बसेस उपलब्ध असूनही प्रवाशांना घेऊन प्रवास करू शकत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पुण्यातील डेपोतून महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी एसटी बसेस सुटत असतात. यामुळे पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र आज, बुधवारी सकाळी पाच वाजल्यापासून एसटी बसेस ज्या पंपावर जाऊन डिझेल भरतात त्या दिशेच्या रस्त्याने बसेसच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. डिझेल पंपावर इंधनाची कमतरता असल्याने या बसेसमध्ये डिझेल टाकण्यात आले नाही. तसेच पंपाकडून असेही सांगितले जात आहे की, एसटी महामंडळाकडून येणारे डिझेलचे पैसे थकल्याने बसेसमध्ये डिझेल टाकण्यात आले नाही. त्यामुळे एसटी डेपोत प्रवाशांची गैरसोय झाली असून एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.