राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा दीडपट अधिक कैदी बंदिस्त असल्यामुळे कोरोना काळात कारागृहात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अवघड झाल्याने अनेक कैद्यांना जामिनावर बाहेर सोडण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष देत होता. मात्र या दरम्यान कारागृहातील १ हजार ६३६ महिला व पुरुष कैद्यांनी त्यांचे अपूर्ण शिक्षण पूर्ण करत पदवी प्राप्त केली.
( हेही वाचा : मेळघाटातील कुपोषण कधी थांबणार? बालमृत्यूंची धक्कादायक आकडेवारी आली समोर… )
कैद्यांनी घेतले शिक्षण
न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या न्यायाधीन कैद्यांपेक्षा शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांचा शिक्षण पूर्ण करण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून आले आहे. शिक्षा झालेल्या राज्यातील १५ कारागृहांतील ९४७ कैद्यांनी, तर ३४६ न्यायाधीन कैद्यांनी सन २०१९-२०२० मध्ये पदवी प्राप्त केली आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत १ हजार २३५ पुरुष कैदी आणि ५८ महिला कैद्यांनी शिक्षण घेतले आहे. तर दिल्लीतील इंदिरा गांधी विश्वविद्यालयाची ३४३ कैद्यांनी पदवी प्राप्त केली आहे. बीए, बीकॉम शाखेची प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाची पदवी प्राप्त करण्यासोबत नागपूर कारागृहातील १८ कैद्यांनी एमएची पदवी प्राप्त केली आहे.
राज्यातील कैदी आघाडीवर
रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारे कैदी कारागृहातून बाहेर सुटल्यानंतर त्यांना रोजगाराचा चांगला मार्ग मिळावा आणि त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये याकरिता कैद्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्यधिष्ठित शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. संगणकाचे कोर्स पूर्ण करण्यात राज्यातील कैदी हे देशातील सर्व कारागृहांत आघाडीवर आहेत. त्याशिवाय कैद्यांना सुतारकाम, हातमाग काम, कृषी काम, टेलरिंग, पेंटिंग, विणकाम अशा वेगवेगळ्या कोर्सेसचे ज्ञान देण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून तुरुंगातून शिक्षण घेणाऱ्या कैद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यामुळे भविष्यात गुन्हेगारी कमी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच कैद्यांचाही शिक्षणामुळे आत्मविश्वास दुणावला आहे.
(हेही वाचा शाहरूख खान लता ताईंच्या पार्थिव देहावर थुंकला? सोशल मीडियावर झाला ट्रोल)
Join Our WhatsApp Community