पहिल्या लॉकडाऊन काळात जंगलात शिकार करुन वन्यप्राण्यांचे मांस खाऊन उरलेली कातडी, हाडे आता विक्रीस उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यांतील वनविभागाच्या कारवायांमध्ये वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी सरपंचांनी आता वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा धंदा तेजीने सुरु केल्याचे उघडकीस आले आहे.
वनव्यवस्थापन समितीतील सदस्य सामिल
गेल्या दोन महिन्यांतील कारवायांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील कारवायांमध्ये वन व्यवस्थापन समितीचे सदस्य आरोपी म्हणून पकडले गेले आहेत. नाशिक येथे आठवड्याभरापूर्वी शहापूर प्रादेशिक वनविभागाने केलेल्या कारवाईत बिबट्याची कातडी हस्तगत केली गेली. यातील अकरा आरोपींची चौकशी केली असता, अजून एका अवैध विक्रीचा सुगावा वनविभागाला लागला. आरोपींकडूनच मिळालेल्या टीपच्या आधारे शुक्रवारी शहापूर प्रादेशिक वनविभागाने येथे धाड टाकली. मुरबाडमधून बिबट्याची कातडी हस्तगत केली गेली. या कारवाईत चार आरोपींपैकी एक आरोपी वनव्यवस्थापन समितीतील सदस्य आहे. पंधरा आरोपींचे एकमेकांशी चांगलेच लागेबंध आहेत. चौकशीदरम्यान, एका आरोपीने बिबट्याची कातडी जंगलात पुरल्याची माहिती दिली. शहापूर येथील कसारा भागांतील ओव्हाळ्याची वाडी या परिसरात जमिनीत गाडलेली बिबट्याची कातडी वनविभागाने हस्तगत केली.
( हेही वाचा: पॉझिटिव्ह बातमी! नव्या चाचण्यांमधून ओमायक्रॉन गायब…)
बिबट्यांच्या कातड्या हस्तगत
गेल्या आठवड्याभरात शहापूर प्रादेशिक वनविभागाने तीन बिबट्यांच्या कातड्या हस्तगत केल्या आहेत. जमिनीत पुरलेल्या बिबट्याची कातडी खराब झाल्याने आरोपीने ती विकली नाही असे स्पष्टीकरण दिले. या तिन्ही कातड्या नागपूर येथील प्रयोगशाळेत डीएनए तपासणीसाठी पाठवले जातील, असे शहापूर वनविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव यांनी सांगितले.