सकाळीच ‘कोकण रेल्वे’ ठप्प! जनशताब्दीच्या इंजिनात बिघाड

दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस चिपळूणमध्ये बंद पडल्याची माहिती मिळतेय. सकाळच्या दरम्यान, साधारण तासभर जनशताब्दीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ‘कोकण रेल्वे’ची वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

लवकरच वाहतूक होणार पूर्ववत

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कामठे येथील रेल्वे स्टेशनजवळ उभी करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस साधारण अकरावाजेच्या सुमारास ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरात लवकर या एक्सप्रेसचा तांत्रिक बिघाड दुरूस्त करून पुन्हा तिची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच जनशताब्दी एक्सप्रेसची वाहतूक पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

(हेही वाचा –‘जनपथा’वर झळकणार महाराष्ट्रातील क्रांतीकारकांची शौर्यगाथा!)

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस चिपळूणमध्ये बंद पडल्याने या मार्गावरील सर्वच लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावत आहेत. जनशताब्दीच्या तांत्रिक बिघाडामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून त्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांध्ये नाराजीचं वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here