तालिबानच्या ताब्यानंतर मानवी संकटाचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे देशाच्या पश्चिमेकडील बाघिस प्रांतात जीवित आणि मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे. तुर्कमेनिस्तानच्या सीमेवर अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बाघिस प्रांतात सोमवारी दोनदा भूकंपाचे धक्के बसले. भूकंपामुळे आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
At least 12 people killed in an earthquake in Badghis province in western Afghanistan: TOLOnews
— ANI (@ANI) January 17, 2022
(हेही वाचा – कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ! ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा’)
भूकंपामुळे अनेक घरे कोसळली
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता 5.3 रिश्टर स्केलचा पहिला भूकंप जाणवला, तर 4.9 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप दुपारी 4 वाजता झाला. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 30 किलोमीटर (18.64 मैल) खोलीवर होता. भूकंपग्रस्त दुर्गम गावांमध्ये अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रांताच्या संस्कृती आणि माहिती विभागाचे प्रमुख बस मोहम्मद सरवारी यांनी सांगितले की, भूकंपामुळे अनेक घरे कोसळली आहेत. प्रांताच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या कदीस जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे आणि सर्वाधिक जीवितहानी झाली आहे.
शुक्रवारीही भूकंपाचे धक्के
यापूर्वी शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानमधील फैजाबादजवळ भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मात्र, त्यावेळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 इतकी मोजली गेली. शुक्रवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 117 किमी आग्नेयेला होता.
Join Our WhatsApp Community