लोकहिताचे प्रकल्प साकारायचे असल्याचे भासवत सर्वसामान्य लोकांकडून पैसे गोळा करुन ते पैसे वैयक्तिक बॅंक खात्यात वळवल्याचा आरोप करत ईडीने पत्रकार राणा आयुब हिच्याविरोधात विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच, आतापर्यंत राणाच्या बॅंक खात्यातील 1 कोटी 77 लाख रुपयांची रक्कमदेखील ईडीने जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये राणाने कोविड काळात महाराष्ट्र,आसाम, बिहार येथे झोपडपट्टीत राहणा-या लोकांना मदत करणे, तसेच अन्य काही समाजहिताची कारणे दाखवत केट्टो या ऑनलाइन प्लॅटफाॅर्मद्वारे सर्वसामान्य माणसांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला होता. या कामासाठी तिला लोकांकडून 2 कोटी 69 लाख रुपये मिळाल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. हे पैसे तिच्या वडिलांच्या, तसेच बहिणीच्या बॅंक खात्यामध्ये जमा झाले होते. त्यानंतर हे पैसे त्या दोघांच्या खात्यातून राणाच्या खात्यामध्ये वळवल्याचे तपासात आढळले. तिच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर या पैशांतली 50 लाख रुपयांची रक्कम तिने मुदत ठेवींमध्ये गुंतवली, तर आणखी 50 लाख रुपये तिच्याच दुस-या बॅंक खात्यामध्ये वळवले. ज्या कारणांसाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता. त्यातील केवळ 29 लाख रुपयेच त्या कामासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले. तर बाकीच्या पैशांसाठी तिने बनावट बिले सादर केल्याचाही आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी गाझियाबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यातील आर्थिक व्याप्ती लक्षात घेता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. 4 एप्रिल 2022 रोजी राणा आयुब हिच्या बॅंक खात्यातील सर्व रक्कम जप्त करण्यात आली.
( हेही वाचा: १३ माणसांचा बळी घेणाऱ्या वाघाला पकडले; वाचा… त्या २४ तासांचे थरारक वर्णन!)
Join Our WhatsApp Community