ईडीकडून काही दिवसांपूर्वी २०० कोटींचा घोटाळा केल्या प्रकरणी सुकेश चंद्रशेखर याची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध ७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आता सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिनची ७.२७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. सुकेश याने जॅकलिनला ५.७१ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा अंदाज ईडीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचारी ६ मे रोजी करणार निदर्शने! )
७ कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
सुकेश चंद्रशेखर याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यावधी रुपये केले खर्च केले. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला तब्बल ५२ लाखांचा घोडा तर, ९ लाखांच्या पर्शियन मांजरी भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या. याशिवाय तिच्यासाठी चार्टर्ड फ्लाइट्स सुद्धा बुक करण्यात आल्या होत्या. सुकेशच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन महत्वाची साक्षीदार आहे असे ईडीचे म्हणणे आहे. तसेच काही जॅकलिन व सुकेश यांच्यातील जवळीक सिद्ध करणारे फोटो व अनेक पुरावे काही दिवसांपूर्वी ईडीला मिळाले होते. याप्रकरणी ईडीने जॅकलिनची ७ कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.