मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामध्ये गुरुवारी अमलबजवणी संचालनालय अर्थात ईडी च्या अधिकाऱ्यांनी भेट देत तेथील महत्त्वाच्या नस्ती (फाइल्स) यांची पाहणी करून त्या सर्व फाइल्सच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती ते घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता ईडीचे अधिकारी या कार्यालयात दाखल झाले होते, तेव्हा पासून रात्री दहा वाजेपर्यंत कागदपत्रे जमवा जमव करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे ज्या अधिकारी आणि व्यक्तीच्या घरी जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करत घराची झाडाझडती केली होती, त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे पडताळण्यासाठी त्या फाईल्समधील कागदपत्रांची झेरॉक्स प्रत काढून हे अधिकारी आपल्या सोबत घेऊन गेले असून तब्बल ४ ते ५ कागदपत्रांचे गठ्ठे होतील एवढा पुरावा अधिकारी जमा करून घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ईडीची छापेमारी; आढळल्या कोट्यावधींच्या एफडी आणि…)
कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने १५ ठिकाणी छापे टाकले. त्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या सह सनदी अधिकारी संजीव जयस्वाल, जिथून निविदा प्रक्रिया राबवली गेली त्या मध्यवर्ती खरेदी खाते विभागाचे तत्कालीन महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादर, या खात्याचे अन्नदाते, राठोड यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यात जयस्वाल यांच्या घरी ४ तास तपासणी सुरू होती, तर बिरादर यांच्या घरी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तपासणी सुरू होती.
सूरज चव्हाण यांच्या घरीही उशिरा पर्यंत तपासणी सुरू होती आणि त्यात काही व्हाट्सएपच्या चॅट चे पुरावे हाती लागल्याची माहिती मिळत आहे. बुधवारच्या छापेमारीनंतर त्यातील काही मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीचे अधिकारी महापालिकेच्या भायखळा येथील मध्यवर्ती खरेदी खाते कार्यालयात दुपारी पोहोचले आणि आवश्यक फाईल्स मागवून त्यातील कागदपत्रांची झेरॉक्स काढून घेतल्या असल्याची माहिती मिळत आहे. रात्री दहा वाजता हे कागदी पुरावे घेऊन हे सर्व अधिकारी निघून गेले. त्यामुळे तब्बल आठ तास हे अधिकारी फाईल्सची तपासणी करून त्यांच्या झेरॉक्स प्रती काढत होते अशी माहिती मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community