ईडीच्या छाप्यानंतर हादरलेल्या ‘डी’ कंपनीला ईडीने आणखी एक झटका दिला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्या बंद घरावरील छाप्यानंतर ईडीने तळोजा तुरुंगात कैद असलेल्या दाऊद याचा भाऊ इकबाल कासकरचा ताबा मिळविण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, या अर्जावर लवकरच न्यायालयात सुनावणी होणार आहे. ईडीकडून इकबाल कासकर याला मनीलॉन्डरिंगच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेले असून त्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( हेही वाचा : बापरे! पतीने सोफा उघडला अन् दिसला पत्नीचा मृतदेह )
ईडीची छापेमारी
ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी २०१७ मध्ये खंडणीच्या गुन्ह्यात इकबाल कासकरला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आलेली आहे, २०१७ पासून इकबाल हा तळोजा तुरुंगात असून इकबालला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे देखील मनसुख हिरेन हत्या प्रकणात तळोजा तुरुंगात आहेत. ईडीने डी कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनीलॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर, ईडीकडून सोमवारी दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घरासह १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान ईडीने छोटा शकील याचा मेव्हुणा सलीम फ्रुट याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री उशिरा त्याला सोडून देण्यात आले होते. दरम्यान सलीम फ्रुट याला बुधवारी पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते.
इकबाल कासकरचा ताबा ईडीला मिळण्याची शक्यता
ईडीच्या या कारवाईने दाऊद कंपनी हादरली असताना ईडीने मनी लॉन्डीरिंगच्या गुन्ह्यात दाऊद चा भाऊ इकबाल कासकरचा ताबा मिळविण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालयात लवकरच सुनावणी होणार असून इकबाल कासकरचा ताबा ईडीला मिळण्याची शक्यता आहे. ईडीकडून इकबाल याला अटक करून त्याच्याकडे डी कंपनीचे आर्थिक कंपनीचे मार्ग आणि दाऊदच्या साम्राज्याची माहिती घेतली जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रनेने (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील याच्यासह डी कंपनीच्या सात कुख्यात गुंडांविरोधात गुन्हा दाखल केल्याचेही सांगण्यात येत आहे. हे सर्व जण भारतातीत दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा संशय आहे. त्यांचे संबंध पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल-कायदा यांसारख्या संघटनांशी असल्याचाही तपास यंत्रणेला संशय आहे. इकबाल कासकरच्या चौकशीत नेमकी काय माहिती मिळते यावर ईडीची पुढील कारवाई होईल. यातून राजकीय नेत्याचांही पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दाऊदचा खास हस्तक छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुट याला मंगळवारी ईडीने ताब्यात घेतले असून त्याचीदेखील चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. सलीम फ्रुट अनेकदा बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानात गेला होता, असा संशय तपास यंत्रणांना असून त्याच्या चौकशीतदेखील महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community