देवा रं देवा देवा…
देवा रं देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू, कनवाळू
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू…
हे गाणं ऐकायला मज्जा येते, नाचावंसं वाटतं. पण आता काही जणांना या गाण्यामागची वेदना जाणवतेय. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले लग्नाळू ‘बॉईज’ आता खरंच देवाचा धावा करत आहेत. कारण ब्रेक दि चेन मुळे त्यांचा दिल ब्रेक झाला आहे. ते बिचारे तळमळू लागले आहेत. आता विषयच खोल आहे ना… दात आहेत पण चणे नाही म्हणतात ना, तशी अवस्था झाली आहे त्यांची. कारण मियां, बिबी, काज़ी सगळे राज़ी, पण कोरोनाने मारली ना बाजी. काय करता आता? बरं सरकारने सांगितलं आहे लग्न करा, पण फक्त 25 माणसं बोलवा आणि दोन तासांत कार्यक्रम उरका. आहे की नाही अवघड जागेचं दुखणं? सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. अहो साहेब ते लग्न आहे, फेसबूक लाइव्ह नाहीये येवढ्या लगेच संपायला… असं या लग्नाळूंचं म्हणणं आहे.
आता बरोबर आहे त्यांचं पण,
दोन ‘मनांचं’ मिलन, फक्त दोन ‘तासांत’? बहुत नाइन्साफी…
लग्न म्हणजे आयुष्याची सेकंड इनिंग. पण इथे इनिंग सुरू व्हायच्या आधीच सामना रद्द झाला ना भावांनो. शुभमंगल होण्याआधीच सगळं सावधान झालं आहे. त्यामुळे हे लग्नाळू आता चिंतातूर झाले आहेत. कोरोनाची चेन जोपर्यंत मोडत नाही, तोपर्यंत यांना काही चैन पडणार नाही. ‘Bride’ to be & ‘Groom’ to be म्हणता म्हणता, आता लग्नाळूंवर to be or not to be म्हणायची वेळ आली आहे.
आली ‘लाट’, लागली ‘वाट’
एप्रिल आणि मे जसा हा आंब्याचा सीझन, तसाच लग्नाचाही सीझन. मात्र गेल्या वर्षीपासून या महिन्यांत अनेक लग्नसोहळे रद्द झाले. गेल्या वर्षी आलेले कोरोनाचे संकट यावर्षी देखील कायम असल्याने, राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची दुसरी लाट आल्याने हा निर्णय घेतला खरा, पण यामुळे भावी नवदाम्पत्यांच्या आयुष्यात मात्र ढवळाढवळ झाली. याचा फटका लग्नाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या भावी जोडप्यांना बसला.
दोन ‘तास’, मोठा ‘त्रास’
यापूर्वी लग्न समारंभांसाठी 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती 100वर नेण्यात आली. आता मात्र अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नाही तर अवघ्या 2 तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम पार पाडायचे आहेत. या नियमांचे पालन झाले नाही, तर तब्बल 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. मात्र दोन तासांत आणि तेही २५ माणसांच्या उपस्थितीत लग्न शक्य नसल्याने अनेकांनी आपल्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या किंवा रद्द केल्या आहेत.
(हेही वाचाः वाचाळवीर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची समज! मंत्रिमंडळात लसीकरणाच्या श्रेयवादाचा मुद्दा गाजला?)
कोर्ट मॅरेजवर भर
जर २५ माणसांमध्ये आणि अवघ्या दोन तासांमध्ये लग्न उरकायचे तर कोर्टात लग्न केलेले बरे, असा विचार करुन हॉलमधील लग्नं रद्द करुन घरच्या घरी किंवा कोर्टात लग्न करण्याचा निर्णय आता जोडपी घेत आहेत. हॉलसाठी पैसे खर्च करायचे आणि इतक्या घाईघाईत लग्न उरकायचे, त्यापेक्षा लग्न कोर्टात केलेलेच बरे असा विचार अनेक जण करू लागले आहेत.
एप्रिल गेला, आता मे ही जाणार?
राज्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात तब्बल ९० टक्के लग्ने ही पुढे ढकलली गेली. ही परिस्थिती फक्त मुंबईतलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे. त्यातच आता आणखी लॉकडाऊन वाढणार यामुळे मे महिना देखील असाच जाणार, याची चिंता आता हॉल मालकांना वाटू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने २५ लोकांची उपस्थिती ही मर्यादा न ठेवता, हॉलची क्षमता बघून किती माणसांची उपस्थिती ठेवावी याचे नियम आखून दिले पाहिजेत. आज २५ माणसांमध्ये लग्न करणे शक्य नाही. वधू पक्षाचे 12 उमेदवार, वर पक्षाचे 12 उमेदवार आणि एक नामनिर्देशित सदस्य म्हणजे भटजी, इथेच झाले की 25. मग इतर अपक्षांनी काय करायचं, असं काहींचं म्हणणं आहे.
माझ्या घरचेच ५० जण आहेत. त्यात माझे फ्रेंड्झ वेगळे. सरकार म्हणते २५ जणांमध्ये लग्न उरका. ते सुद्धा दोन तासांत. आज मुलींना मेकअपसाठी तीन तास आणि हेअरसाठी १ तास लागतो. त्यात विधी, आहेर, जेवणाचा कार्यक्रम हे सगळं दोन तासांत कसं शक्य आहे. किती सेल्फी काढायचे आहेत मला लग्नात. प्रिवेडिंग फोटो शूट पण करायचे आहे. मी होणा-या नव-याला स्पष्ट सांगितलं आहे. लग्न होणार तर थाटातच होणार, नाहीतर होणार नाही. लग्न ही आनंदाची आणि कायम आठवणीत राहणारी बाब आहे. ते इतक्या घाईघाईत उरकून कसं चालेल?
-प्राजक्ता, वधू
मी मागील दोन वर्षांपासून लग्न करण्यासाठी मुली पाहत होतो. मात्र काही ना काही कारणामुळे लग्न ठरत नव्हते. माझे वय आता ३४ आहे, आता माझे लग्न ठरले होते. तारीख देखील ठरली असल्याने मी हॉल बूक केला आहे. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन वाढणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे मला एक तर लग्न पुढे ढकलावे लागेल किंवा साधेपणाने करावे लागेल.
-प्रतिक वरक, वर
(हेही वाचाः ‘गर्लफ्रेंडला’ भेटायचं आहे, कोणतं ‘स्टीकर’ लावू? विरहव्याकूळ तरुणाचा पोलिसांना प्रश्न! काय मिळाले उत्तर? वाचा…)
एक तर सरकारने फक्त २५ जणांची उपस्थिती ठेवली त्यात वेळेची मर्यादा देखील २ तासांची ठरवली आहे. त्यामुळे अनेक जण लग्न रद्द करत असून, पुन्हा पैसे मागत आहेत. काहींना आम्ही तारखा बदलून देत आहोत. आज आमच्याकडे कर्मचारी कामाला असतात. त्यांचा पगार, हॉलचा मेंटनंन्स हा सर्व खर्च असतो. जर लग्नच होत नसतील, तर या सर्वांचे पगार तरी कुठून देणार? त्यामुळे सरकारने किमान हॉलच्या क्षमतेनुसार माणसांना परवानगी द्यावी.
अविनाश पाटील, हॉल मालक
निर्बंध फक्त याच क्षेत्राला का? एकीकडे हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारातील संकुले, मार्केट कमिटी आदी ठिकाणी मोठी गर्दी होत असताना केवळ लग्नसोहळे, समारंभांवर लादलेले निर्बंध अन्यायकारक आहेत. अशा प्रकारचा कोणताही घरगुती कार्यक्रम असला, तरी त्याला २० जणांच्या उपस्थितीत करणे केवळ अशक्य आहे. अशा स्थितीत प्रशासनाला अन्य ठिकाणी होणारी गर्दी दिसत नाही का?
समीर, हॉल मालक