‘एमपीएससी’वर आली प्रश्न आणि उत्तरे बदलण्याची नामुष्की!

126

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या सगळ्या परीक्षांमध्ये ढिसाळपणा दिसून आला आहे. मग ती टीईटी असो किंवा म्हाडाची परीक्षा असो. बारावीच्या परीक्षेचाही पेपर फूटल्याने, गोंधळ उडाला होता. एमपीएससी आणि दहावी – बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकांत सतत बदल करुन विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आले. या सगळ्या परीक्षांमधील गोंधळ संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे. आयोगाने 23 जानेवारी 2022 ला घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे. यात तब्बल आठ प्रश्न रद्द करण्यात आले, तर तीन प्रश्नांची उत्तरे बदलण्याची नामुष्की या आयोगावर ओढावली आहे.

न्यायालयातही धाव घेण्यात आली

23 जानेवारी 2022 ला 390 पदांसाठी घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची पहिली उत्तरतालिका 27 जानेवारीला जाहीर करण्यात आली. नियमानुसार पहिल्या उत्तरतालिकेवर 3 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या. ऑनलाईन हरकती आणि तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन आयोगाने 23 मार्चला सुधारित अंतिम उत्तरतालिका संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये सामान्य अध्ययन पेपरमधील सात चुकीचे प्रश्न रद्द करण्यात आले, तर तीन प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला. याशिवाय ‘सी-सॅट’ पेपरमधील एक प्रश्न रद्द करण्यात आला आहे. याआधी ‘संयुक्त परीक्षा गट-ब’ मध्येही आयोगाने अंतिम उत्तरतालिकेत दोन प्रश्नांना चुकीच्या उत्तराचा पर्याय दिला होता. यावर काही उमेदवारांनी न्यायालयातही धाव घेतली होती.

( हेही वाचा: टॅक्सची बचत करायचीय? तर ‘या’ खास टिप्स तुमच्यासाठी! )

नेमका कोणत्या अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा?

आयोग पहिली उत्तरतालिका जाहीर करून विद्यार्थ्यांचे त्यावर आक्षेप मागवते. यात चुका समोर आल्यास काही प्रश्न रद्द केले जातात. त्यामुळे आयोग पहिली उत्तरतालिका कुठल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर तयार करते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय आयोगाकडून वारंवार अशा चुका झाल्यास, उमेदवारांनी नेमक्या कुठल्या अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा, असाही  प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.