Election Commission : मतदानाची टक्केवारी

मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व अहवाल, कागदपत्रे तपासून आणि छाननी करुन मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. “Voter Turnout App” वर प्रसिध्द झालेली सर्व टक्केवारी अंदाजित असते. याचे कारण  उघड आहे.

230
Lok Sabha Election Result 2024 : मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

डॉ. किरण कुलकर्णी

भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून “Voter Turnout App”  तयार केलेले आहे.  हे ॲप  Google Play Store  व Apple Store  वर अथवा  आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि  कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. हयावर मतदानाच्या दिवशी सकाळी 9.00 नंतर दर 2 तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते.  त्यामुळे मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी आणि ॲपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे स्वाभाविक आहे. या ॲपवर राज्य, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यातील अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. हे ॲप डाऊनलोड करुन वापरण्याची लिंक  सोबत जोडली आहे. (Election Commission)

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN

https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882

दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5.00 वाजताची अंदाजित टक्केवारी बघता येते. त्यानंतर संध्याकाळी 7.00 वा. बहुतेक ठिकाणचे मतदान संपत असल्यामुळे पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. परंतु काही मतदान  केंद्रावर संध्याकाळी 6.00 वाजण्याच्या आत म्हणजे मतदानाची  वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान चालू राहते. काही मतदान केंद्रावर अगदी रात्री 9.00 वाजेपर्यंत सुध्दा मतदान अशाप्रकारे  चालू असण्याची उदाहरणे आहेत.

मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके विधानसभेच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी येवून मतदान यंत्रे, केंद्राध्यक्षांची डायरी व इतर कागदपत्रे सादर करतात. काही मतदान केंद्रे दुर्गम भागात तसेच विधानसभा मुख्यालयापासून दूर असल्यामुळे तेथील मतदान पथकांना मुख्यालयी पोहोचण्यास  उशिर होतो किंवा कधी कधी  पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे देखिल उशिर होवू शकतो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तामध्ये विधानसभा  मुख्यालयात पोहोचल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षितरित्या क्रमवार एकत्र लावून लोकसभा मतदार संघाच्या मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालयामध्ये येण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओच्या निगराणीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार  यांना  सूचित केल्यानंतरच प्रवास चालू करतात. अनेक ठिकाणी  मतदान यंत्रे आणि संबंधित कागदपत्रे मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपार सुध्दा होते दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्री पर्यत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी  निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी “Voter Turnout App” वर जाहीर करतात. परंतु ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी “Close of Poll”  म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते. केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरुन खात्री करुन जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी  आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून  “Voter Turnout App” वर  प्रविष्ट करण्यात येते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होवून मतदानाची अंतिम टक्केवारी  “Voter Turnout App” वर प्रसारित होते. त्याला “end of poll” अंदाजित टक्केवारी म्हणतात.  हयासाठी “मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री” ही अंतिम समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.

(हेही वाचा – Dombivli MIDC Blast: डोंबिवलीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…)

म्हणजे मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व अहवाल, कागदपत्रे तपासून आणि छाननी करुन मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. “Voter Turnout App” वर प्रसिध्द झालेली सर्व टक्केवारी अंदाजित असते. याचे कारण  उघड आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपते तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी केंद्राध्यक्षांकडे आणि प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी सूपुर्द केलेली असते. ती संख्या आणि टक्केवारी हा मूळ आधार असतो.

एखादया राजकीय पक्षाने आपणाकडून नियुक्ती केलेल्या सर्व मतदान केंद्रावरच्या प्रतिनिधींकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि  टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी बहुतांश निश्चितपणे जुळेल. तरी देखिल “Voter Turnout App” मध्ये अंतिम टक्केवारीला  Approximate असेच म्हटले आहे.  त्याचे कारण असे की ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधींकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरी मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये पोस्टल बॅलेट  (डाक मतपत्रिका) द्वारे झालेल्या मतदानाची संख्या  समाविष्ट केली जाते.  त्यामुळे मतदानानंतरची मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यांच्यात किंचीतशी वाढ दिसून येते. त्यामुळे  “Voter Turnout App” वर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या  दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील  मतदानाची टक्केवारी  असते. त्यामध्ये  Election Duty Certificate (EDC)  मतदारांची मतदान यंत्रात केलेल्या मतदानाची संख्या समाविष्ट असते. त्याबाबतची नोंद संबंधित केंद्राध्यक्षांने  डायरीत घेवून त्याची माहिती मतदान केंद्रातील प्रतिनिधींना दिलेली असते.

ही सर्व रचना लक्षात घेतल्यास या रचनेमध्ये बारकाईने विचार करुन त्याचे काटेकोर असे कार्यवाहीचे टप्पे भारत निवडणूक आयोगाने  गेल्या लोकसभा निवडणूकीपासूनच निश्चित केलेले आहेत. ही पध्दत आता चांगली प्रस्थापित झालेली असून पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण आहे.

(हेही वाचा – Baramati Traffic Police: वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणारे रडारवर, बारामतीत १२५ जणांवर कारवाई)

मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल याबाबत चर्चा करताना सर्वांनी ही प्रक्रिया नीट समजावून घेवून मगच त्यावर चर्चा करावी असे सुचवावेसे वाटते.  अन्यथा एखादा  गैरसमज, अफवा  आणि अज्ञानाचे प्रदर्शन  याशिवाय यातून काहीच हाती लागणार नाही.

(लेखक महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आहेत.)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.