बिबट्यांना आकर्षित करतोय कृत्रिम प्रकाश

128

कल्याण, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर या पट्ट्यांत गेल्या काही वर्षांत बिबट्या मानवी वस्तीजवळ येत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मानवी वस्तीजवळ भक्ष्य मिळवण्यासाठी येणा-या बिबट्यांना आता मानवी वस्तीजवळील कृत्रिम प्रकाश सतावत नाही आहे. हे धोक्याचे लक्षण असल्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली. मुंबई महानगर प्रदेश तसेच मोठ्या शहरांत वाढत्या मानव-बिबट्या संघर्षात कृत्रिम प्रकाशात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे निरीक्षणही पर्यावरणतज्ज्ञांनी नोंदवले.

(हेही वाचा -)कल्याणमधील इमारतीत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी साडेआठ तासांचा थरार

पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांनी या मुद्द्यावर माहिती देताना सांगितले की, वीस वर्षांपर्यंत जनावरांना कृत्रिम प्रकाशाची भीती वाटायची. कृत्रिम प्रकाशाजवळील अधिवास नैसर्गिक नसल्याचे त्यांना या प्रकाशाची सवय नसायची. त्यामुळे वन्यप्राण्यांचा संचार शहारापासून अलिप्तच राहायचा. वन्यप्राण्यांमध्ये वयस्कर प्राण्यांना जंगलात शिकार करणे अवघड झाल्यास ते मानवी वस्तीजवळ भक्ष्य मिळवण्यासाठी वळतात. वाढत्या प्रदेशवादातून तरुण बिबटेही शहराकडे वळू लागले आहेत. मादीपाठोपाठ नर बिबट्याही शहराकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही शक्यता कुबल यांनी वर्तवली. बिबट्या कृत्रिम प्रकाशाला न घाबरता मानवी समूहाकडे वळत कोंबड्या, भटक्या कुत्र्यांची सहज शिकार करतो. त्याला शिकार करणे सहज सोपे पडते.

कल्याण येथील घटनेतही वेगवेगळे तर्क उपस्थित केले जात असताना शहरांत आलेला साडेपाच वर्षांचा बिबट्या हा कुठून आला, यावरही वेगवेगळे तर्क मांडले जात आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरेतून बिबट्याला कल्याणपर्यंत जाण्याचा मार्ग खडतर आहे. कल्याणजवळील हाजीमलंग डोंगरात बिबट्यांचा संचार आहे. यंदाच्या वर्षांत पुण्यातील जुन्नरहून कल्याणपर्यंत बिबट्या येऊन गेला होता. त्यामुळे घाटपरिसरातून बिबट्या या भागांत येऊ शकतो, असा अंदाज ठाणे वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी व्यक्त केली.

यंदाच्या वर्षांतील कल्याण ते शहापूर पट्ट्यातील बिबट्या मानवी वस्तीजवळ घुसल्याच्या घटना

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला बदलापूर येथील फार्महाऊस जवळ बिबट्याच्या तोंडाजवळ पाण्याची रिकामी बाटली अडकल्याने तो इतरत्र फिरत असल्याचा व्हिडिओ प्रचंड गाजला. या बिबट्याला शोधण्यासाठी वनाधिका-यांची चांगलीच पराकाष्ठा झाली. बिबट्याचा जीव वाचवण्यात वनाधिकारी यशस्वी झाले असले तरीही या घटनेनंतर फार्म हाऊस जवळील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा चांगलाच गाजला.

दुस-या घटनेत शहापूर येथील मानवी वस्तीत बिबट्या घुसला. भक्ष्याच्या शोधात बिबट्याने थेट घरात उडी घेतली. घरातील कुटुंबीयांनी प्रसंगावधानता दाखवून घरातून पोबारा केला. या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर तानसा अभयारण्य आहे. तानसा आणि वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यात ये-जा करण्यासाठी बिबटे शहापूरजवळचा भ्रमणमार्ग वापरतात. परंतु बिबटे मानवी वस्तीजवळ आल्याची ही पहिलीच घटना होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.