मुंबई-नवीमुंबई, ठाण्यासह डोंबिवली, अंबरनाथमध्येही बत्ती गुल! काय आहे कारण?

137

मंगळवारी सकाळी सव्वा दहावाजेच्या सुमारास दादरसह ठाणे, पालघर, नालासोपारा, नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, डोबिंवली आणि उल्हासनगर परिसरात बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळाले. पडघा येथील महावितरणाच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला असल्याने सांगितले जात आहे. या तांत्रिक बिघाडाचा फटका मुंबईतील शिवाजी पार्क येथील राज्यपालांच्या कार्यक्रमाला बसल्याचे दिसून आले.

वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पडघा मेन लाईन ट्रीप झाल्याने ठाण्यातील काही भागात, पालघर, नालासोपारा, अंबरनाथ, कल्याण, डोबिंवली, उल्हासनगर, बदलापूर, नवीमुंबईसह, नेरूळ, जुई नगर यासांरख्या भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. पडघ्याच्या महापारेषण उच्चदाब वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण पालघर विभागातील खंडित झाला. या तांत्रिक बिघाडामुळे अर्धा ते पाऊण तासांपासून बत्ती गुल झाल्याने या भागातील नागरिक चांगलेच हैरान झाल्याने संताप व्यक्त करत होते. या भागातील वीज पुरवठा सुरू होण्यास तासभर लागणार असून तर यातील काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाल्याचे सांगितले जात आहे.

वीजेची मागणी सुरळीत ठेवण्यासाठी भारनियमन!

मुंबई शहर आणि उपनगरात टाटाकडून वीज पुरवठा करण्यात येतो. या बिघाडामुळे दादर, माहीम, वांद्रे येथील वीज पुरवठा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, महापारेषणच्या 400KV कळवा ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबई आणि उपनगरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजेची मागणी सुरळीत ठेवण्यासाठी काही भागात भारनियमनही केले जाऊ शकते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टाटा पॉवरने म्हटले.

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह? औरंगाबादेत १३ दिवस जमावबंदी)

महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू

पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत झाला असून वीज पुरवठा खंडित झालेल्या काही भागांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.