महाराष्ट्र वीज नियामक आयोग नवीन नियामक आराखडा आणणार आहे. जर या आराखड्याला मंजुरी मिळाली तर येणाऱ्या काळात मुंबईमध्ये वीज महाग होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही काळात मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसणार, असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आणि एमईडीसीएलसारख्या वीज कंपन्यांचा दैनंदिन खर्च वाढला आहे. दैनंदिन भांडवली खर्चासाठी गुंतवणुकीची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर हा नवा आराखडा नियामक आयोगाने तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा – वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार की नाही? काय म्हणाले ऊर्जामंत्री)
…तर मुंबईकरांना बसणार मोठा फटका
भूमिगत टाकण्यात आलेल्या वीज वाहिन्यांसाठी किंवा नव्याने जोडण्यात येणाऱ्या वीज वाहिन्यांसाठी वीज कंपन्यांना मोठ्याप्रमाणात खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे. यातील 50 टक्के खर्च हा ग्राहकांच्या खिश्यातून वसूल करण्याचा प्रयत्न या नव्या प्रस्तावात आहे. जर या आराखड्याची अंमलबजावणी झाली तर मुंबईकरांना वीजबिलाच्या स्वरुपात मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत.
बेस्ट आणि टाटा ग्राहकांना बसणार फटका?
विजेची वाढती मागणी आणि टंचाईमुळे कोळसा महाग झाल्याने इंधन समाजोयन आकार म्हणून शुल्कवाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे बेस्ट आणि टाटाच्या सुमारे 18 लाख ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. मुंबईत औष्णिकसह 180 मेगावॅट वायू 440 मेगावॅट जलिद्युत्त आणि 350 मेगावॅट वीज हरीत ऊर्जा स्त्रोतांकडून पुरवली जात आहे. या माध्यमातून वीजदरवाढ टाळण्याचा प्रयत्न असल्याचे टाटा पॉवरने म्हटले आहे. मात्र तरी देखील येणाऱ्या काळात वीजदर वाढ होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.