भंडा-यात हत्तींचे दर्शन; सोमवारी सकाळी हत्तीची विष्ठा आणि पाऊलखुणा वनाधिकाऱ्यांना आढळल्या

168

अनेक वर्षांच्या कालखंडानंतर भंडारा जिल्ह्यांत रविवारी मध्यरात्री हत्तींचे आगमन झाले आहे. ऑगस्ट महिन्यापासून गडचिरोली आणि गोंदियात वास्तव्य करणा-या तब्बल ३५ हत्तींचा समूह आता भंडा-यातील साकोली तालुक्यातील महालगाव येथील जंगलात आला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास हत्तींचा कळप भंडा-यात दाखल झाला. या भागांतील स्थानिकांनी हत्तींच्या कळपाजवळ जाऊ नये, असे आवाहन भंडारा वनविभागाने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोंदियात वास्तव्य असलेल्या हत्तींचा कळप नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात यावा, यासाठी वनाधिका-यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र हत्तींनी भंडा-याच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली होती. अखेरिस सोमवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्याची सीमारेषा ओलांडली. पूर्वी नागझिरा डोह जंगलात हत्तींचे वास्तव्य होते. त्यामुळे ब-याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भंडा-यात हत्ती परतल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महालगाव , वडद आणि शिपडी या गावातील लोकांनी हत्तींच्या कळपाजवळ जाऊ नये, असे आवाहन वनाधिका-यांनी केले आहे. गोंदियात हत्तींच्या कळपाचा पाठलाग करताना हत्तीने एका माणसाला पकडून जमिनीवर आपटले होते. या दुर्घटनेत माणूस जागीच ठार झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भीती वनाधिका-यांना सतावत आहे. हत्तींचा कळप दिवसा जंगलात राहतो, रात्री त्यांची ये-जा सुरु असते. ड्रोनच्या माध्यमातून आम्ही हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत. गावक-यांनी सतर्क राहावे, वनाधिका-यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भंडारा वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी केले आहे.

( हेही वाचा: विलेपार्ले ते जोगेश्वरीतील या वस्त्यांमध्ये मंगळवार, बुधवारी पाणी कपात )

हत्तींचा वावर आढळून आल्यास आवश्यक काळजी घेण्याचे उपाय 

  • हत्ती जंगलातून गावात घुसण्याच्या मार्गावर, शेताजवळ रात्री आग पेटवून ठेवा. काही अनुचित घटना घडल्यास तत्काळ वनविभागाला कळवावे. नुकसानभरपाईसाठी कार्यवाही करावी.
  • गावाजवळ लख्ख प्रकाश देणा-या वीजेची सोय उपलब्ध करुन घ्यावी, हत्ती लुकलुकणा-या तीव्र प्रकाशाकडे कधीच येत नाही.
  • हत्तींना न आवडणा-या मिरच्या आणि आल्याची लागवड करावी, शेतीच्या चारही बाजूला तिखट मिरची, हळदीची लागवड करावी.
  • जंगलात घर असल्यास घराच्या सभोवताली लाल तिखटात ग्रीस मिसळून दोरीवर लेप लावून ही दोरी घरांच्या चारही बाजूने लावावी.
  • हत्तींना पाहण्यासाठी किंवा त्यांचे मार्गक्रमण सुरु असताना त्यांच्याजवळ जाऊ नका. हत्ती रस्ता पार करत असल्यास वाहनचालकांनी रस्ता पार करण्याचा प्रयत्न करु नये.
  • हत्तींना गोटे किंवा दगडांनी मारु नये, अन्यथा हत्ती हिंसक होतात. हत्तींच्या कळपाजवळ असल्यास मोबाईलवर जोरात बोलू नये, यामुळेही हत्ती हिंसक होतात.
  • हत्तींचा वावर असलेल्या जंगलात लाकडे गोळा करायला जाऊ नये, जंगलात प्रातःविधीसाठी जाऊ नये.
  • जंगलात हत्तींचे खा्द्य असलेल्या गवतांच्या प्रजाती तसेच झाडांना तोडू नका.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.