लिफ्टच्या देखभालीच्या कामादरम्यान, लिफ्ट ४० व्या मजल्यावरून कोसळल्यामुळे ग्रॅंट रोड परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. १४ मार्चला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बाळाराम स्ट्रीट, ग्रँट रोड येथील सिद्धज्योती इमारतीत ही दुर्घटना घडली असून, यामधील एकाचा मृत्यू झाला असून २६ वर्षीय अनुभव त्रिपाठी या अपघातातून बचावला आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : ‘या’ कारणांमुळे फेटाळला अनिल देशमुख यांचा जामीन )
४० व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली
सिद्धज्योती इमारतीमध्ये लिफ्टच्या देखभालीचे काम सुरू होते. यादरम्यान ४० व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, यानंतर घटनास्थळी एमएफबी, पोलीस, रुग्णवाहिका, वॉर्ड कर्मचारी दाखल झाले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये दोन पुरूषांचा समावेश आहे. १४ मार्चला सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. या दुर्घटनेतील दोन जखमींपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
एकाचा मृत्यू
या लिफ्टमध्ये अडकलेल्या अनुभव त्रिपाठी (वयवर्ष २६) यांना बाहेर काढून एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली असून प्रकृती स्थिर आहे. एमएफबीद्वारे (MFB) सुटका करण्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे संपूर्ण नाव सूर्यकांत पुजारी असून, जीटी रुग्णालयातील डॉ. सोहेल खान यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलीस करत आहे.
Join Our WhatsApp Community