ठाण्यातील पोलिस स्कूल, रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी! कुणाचा होता ईमेल?

138

ठाणे पोलिस स्कूलला आलेल्या एका ईमेलने खळबळ उडवून दिली आहे. लष्करच्या नावाने आलेल्या या ई-मेलमध्ये पोलिस स्कुलसोबत मुंबईतील रेल्वे स्थानकावर धमाका होणार असून यासाठी ५० जिहादी तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या ईमेलचा शोध घेण्यासाठी ठाणे नगर पोलिसांची दोन, तर सायबर गुन्हे शाखेचे एक अशी तीन पथके तयार करण्यात आली आहे. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस अगोदर लष्करच्या नावाने हा धमकीच्या ईमेलमुळे ठाणे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

५० जिहादी तयार

ठाणे पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मुलांसाठी ठाण्यात पोलिस स्कूल सुरू करण्यात आलेले आहे. या पोलिस स्कूलच्या मेल आयडीवर ‘लष्कर २२’ नावाने हा मेल आला आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःचे नाव जावेद खान असे सांगितले असून आपण ‘लष्कर २२’ चा प्रमुख असल्याचा दावाही केला आहे. हिंदुस्थान में जिहाद का पालन हो, हेच आमचे प्रमुख लक्ष्य असणार आहे, त्यासाठी ‘कुर्बानी’आणि ‘धमाका’ या दोन मार्गाचा अवलंब केल्याचे त्याने ईमेलमध्ये म्हटले आहे. या कामासाठी आम्ही ५० जिहादी तयार आहेत, त्यात डोंबिवलीतील १२ जिहादींची नावे टाकण्यात आली आहेत. इकडची शिक्षण व्यवस्था बंद करून त्याऐवजी मदरसाद्वारे शिक्षण व्यवस्था सुरु करायची असून यासाठी मुंबईतील शाळा, कॉलेज आणि काही रेल्वे स्थानकांवर धमाके केले जातील, अशी धमकी ईमेल वर देण्यात आली आहे.

(हेही वाचा सेनेकडून टिपूचे पुन्हा उद्दात्तीकरण! प्रजासत्ताकदिनी धर्मांधतेला प्रोत्साहन)

शाळा, महाविद्यालयांना सतर्क राहण्याच्या इशारा

जिहाद भारतातील घराघरात पोहोचविणे हेच आमचे मिशन २०२२ असेल, आपण दहशतवादी नसल्याचा दावा यात केला आहे. जिहादसाठी अनेक मुजाहिद्दीन आत्मघात करणारे आमच्याकडे कुर्बानीसाठी तयार आहेत. पोलिसांनी आम्हाला पकडून दाखवावे, असे आव्हान पोलिसांना करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी या ईमेलची गंभीर दखल घेतली असून ठाण्यातील शाळा, कॉलेजस यांना सतर्क राहण्याच्या इशारा देण्यात आलेला असून मुंबई ठाण्यातील रेल्वे स्थानकावर तपासणी सुरू केली आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या तपासासाठी पोलीस ठाण्यातील २ पथके तसेच सायबर सेलचे पथके या ईमेल पाठवणाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. या ईमेल वरील भाषा जरी दहशतवाद्यांसारखी असली तरी हा दिशाभूल करण्याचाही प्रकार असण्याची शक्यताही एका पोलिस अधिकात्याने व्यक्त केली आहे. मेलची सर्वच बाजूनी चौकशी केली जात आहे. मात्र, ठोस कोणतीही माहिती अजूनही पुढे आलेली नसल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.