एन्काऊंटर स्पेशालिस्टला तुरुंगात मिळाले ‘वेस्टर्न कमोड’

प्रदीप शर्माला इंडियन टॉयलेटची सवय नाही. त्यामुळे त्यांचे पोट साफ होत नसल्यामुळे, त्यांना पोटाचा विकार जडला आहे.

121

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माने तुरुंगात वेस्टर्न कमोडची मागणी केली होती. त्याला वेस्टर्न कमोड पुरवण्यात आले असल्याची माहिती, तुरुंग अधिकारी यांनी दिली आहे. त्याची प्रकृती देखील सतत बिघडत असल्यामुळे त्याच्यावर सध्यातरी तुरुंगातच उपचार सुरू असून, वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घेऊन गरज असल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही तुरुंगाधिका-यांनी म्हटले आहे.

तळोजामध्ये इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना नवी मुंबईतील तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेत एकेकाळी काम केलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, सचिन वाझे, सुनील माने, रियाजुद्दीन काझी या माजी पोलिस अधिका-यांना तळोजा तुरुंगात सामान्य कैद्याप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. जी इतर कैद्यांना सवलत मिळते, तीच सवलत यांना देखील मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून हे आरोपी तुरुंगातील इतर कैद्यांप्रमाणेच इंडियन टॉयलेटचा वापर करत आहेत.

(हेही वाचाः ‘त्या’ लॉकअपमध्ये असे काय आहे, की तिथे आरोपी राहण्यास तयार नाही)

पोट साफ होत नाही म्हणून…  

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला इंडियन टॉयलेटची सवय नाही. त्यामुळे त्यांचे पोट साफ होत नसल्यामुळे, त्यांना पोटाचा विकार जडला आहे. तसेच इंडियन टॉयलेटमधे शौंचास बसताना त्याचे पाय, कंबर दुखत असल्यामुळे अखेर प्रदीप शर्माने एनआयए न्यायालय आणि तुरुंग प्रशासनाला वेस्टर्न कमोडची सुविधा देण्यात यावी, असा अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज मान्य करुन तुरुंग अधिका-यांना प्रदीप शर्मासाठी वेस्टर्न कमोडची सुविधा देण्याची सूचना दिली होती. त्यानुसार प्रदीप शर्मा याला ही सुविधा पुरवण्यात आली असल्याची माहिती, तळोजा तुरुंगाचे अधिकारी कौस्तुभ कुर्लेकर यांनी दिली.

(हेही वाचाः ती पैशांची बंडलं प्रदीप शर्मा यांची… महिलेने दिला सीआयडीला दिला जबाब)

मागील काही आठवड्यांपासून प्रदीप शर्माच्या प्रकृतीबाबत तक्रार असल्यामुळे, त्याला तुरुंगातच वैद्यकीय उपचार पुरवण्यात येत असून, गरज भासल्यास वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची तरतूद ठेवण्यात आली असल्याचे कुर्लेकर यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.