नॅशनल हेरॉल्डशी संबंधीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यंग इंडियन लिमिटेडचे कार्यालय सील केले आहे. यंग इंडियन कंपनीने नॅशनल हेरॉल्ड संचालित करणाऱ्या असोसिएट जर्नल्स लिमीटेडचे अधिग्रहण केले आहे. यावेळी काँग्रेस कार्याध्यक्ष सोनिया गांधींचे 10 जनपथ निवासस्थान आणि काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
(हेही वाचा – असा टाळा Monkeypox चा संसर्ग! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सूचना जारी)
ईडीने मंगळवारी नॅशनल हेराल्ड कार्यालयासह 12 ठिकाणी छापे टाकले होते. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरूआणि इतर लोकांनी स्थापन केलेली कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या यंग इंडियनच्या अधिग्रहणाशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाची ईडीने चौकशी केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या मते, यंग इंडियनने असोसिएट जर्नल्सची 800 कोटींहून अधिक संपत्तीमध्ये फेरफार केला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक आणि बहुसंख्य भागधारकांपैकी आहेत. त्यामुळे आयकर विभागाच्या मते, ही मालमत्ता सोनिया गांधी आणि राहुल गांधी, यंग इंडियनचे भागधारक यांची मानली जावी, ज्यासाठी त्यांनी कर भरावा, असे सांगितले जात आहे.