क्रूझ ड्रग्स प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून अशी होणार चौकशी

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी साहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिका-यांची नेमणूक केली आहे.

153

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई पोलिसांत दाखल झालेल्या लेखी तक्रारींचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणात एनसीबीचे पंच प्रभाकर साईल याचा जबाब बुधवारी परिमंडळ-१ च्या कार्यालायत नोंदवण्यात आला आहे.

एनसीबीच्या पंचांचा गौप्यस्फोट

क्रूझ ड्रग्स प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करुन, त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच क्रूझ ड्रग्स प्रकरणातील एनसीबीचा पंच प्रभाकर साईल हा फुटला आणि त्याने आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची डील करण्यात आली होती व त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट केला.

(हेही वाचाः दोन दिवसात जामीन नाही मिळाला तर आर्यन खानची दिवाळी तुरूंगातच!)

विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

क्रूझवरील छापा, आर्यन खानची अटक, त्याच्या सुटकेसाठी २५ कोटींची डील या गुन्ह्यांतील पंच साक्षीदार या सर्वांवर प्रश्न उपस्थित झाले आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मुंबईतील ओशिवरा, एमआरए मार्ग, सहार इत्यादी पोलिस ठाण्यांमध्ये एकमेकांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचाः समीर खानचा जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीकडून न्यायालयात अर्ज)

समीर वानखेडेंसह इतरांवर तक्रारी दाखल

यापैकी मुंबईतील दोन वकिलांनी एनसीबीचे कार्यालय ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते, त्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात समीर वानखेडे, किरण गोसावी यांच्यासह इतरांवर खंडणी, अपहरण यांसारखे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा लेखी तक्रारी केल्या आहेत. मुंबईतील दोन ठिकाणी नवाब मलिक यांच्याविरुद्ध, तर इतर चार तक्रारी एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे, किरण गोसावीसह इतरांविरुद्ध देण्यात आलेल्या आहेत. तसेच एनसीबीच्या क्रूझ प्रकरणातील फुटलेला पंच प्रभाकर साईल याने केलेल्या २५ कोटीच्या डील संदर्भात एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात बुधवारी त्याचा जबाब पोलिसानी नोंदवला आहे.

(हेही वाचाः वानखेडेंच्या चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत पाच अधिकारी दाखल)

वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार?

क्रूझ ड्रग्स प्रकरण संबंधी ज्या काही तक्रारी मुंबई पोलिसांकडे आलेल्या आहेत, त्या तक्रारींची शहानिशा करुन तपास करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी साहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिका-यांची नेमणूक केली आहे. या सर्व तक्रारींची चौकशी, तपास केल्यानंतर गुन्हा दाखल करायचा की नाही, हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.